For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नीट-सीईटी परीक्षांमध्ये केएलई पदवीपूर्व विद्यार्थ्यांचे यश

06:31 AM Jun 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
नीट सीईटी परीक्षांमध्ये केएलई पदवीपूर्व विद्यार्थ्यांचे यश
Advertisement

पत्रकार परिषदेत संचालक कवटगीमठ यांची माहिती

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी प्रवेशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या नीट व सीईटी परीक्षेत केएलई संस्थेच्या पदवीपूर्व कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळविले आहे. चिकोडी येथील शेतकरी कुटुंबातील रक्षिता वाळकेने तब्बल 671 गुण मिळविले आहेत. 31 विद्यार्थ्यांनी 600 हून अधिक गुण मिळविले आहेत. यापुढेही सीईटी व नीट यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना घडविणार असल्याची माहिती केएलईचे संचालक महांतेश कवटगीमठ यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Advertisement

लिंगराज कॉलेजच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेवेळी विद्यार्थ्यांचे यश मांडण्यात आले. नीट परीक्षेत 74 विद्यार्थ्यांनी 500 हून अधिक गुण मिळविले आहेत. निपाणी, चिकोडी, बेळगाव यासारख्या ग्रामीण भागातूनही नीट परीक्षेत विद्यार्थ्यांनी यश मिळविले. जे विद्यार्थी दहावीमध्ये टॉपर आहेत, त्यांना केएलई संस्थेमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. विद्यार्थ्यांना सीईटीसोबतच नीट परीक्षेसाठीही मार्गदर्शन करण्यात येते.

इतर राज्यांचा विचार करता नीट परीक्षेसाठी कर्नाटक अभ्यासक्रमामध्ये मागे पडत आहे. केरळ, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमधील विद्यार्थी पुढे जात असल्याने सरकारी कॉलेजमध्येही नीट, सीईटी परीक्षा मार्गदर्शन सुरू करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सातवीपासूनच विद्यार्थ्यांना नीटविषयीची प्राथमिक माहिती मिळणे गरजेचे आहे. लवकरच केएलईच्या माध्यमातून सीईटी व नीटसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू केले जाणार आहे. यामध्ये इतर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन घेणे सोयीचे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बेळगावसोबत गोकाक, हुबळी येथील विद्यार्थ्यांनीही नीट व सीईटीमध्ये मोठे यश मिळविले आहे. आरएसएल कॉलेजच्या अक्षय खांडेकर याने 921 वा क्रमांक पटकाविला असल्याचे सांगण्यात आले. यावेळी केएलईचे संचालक जयानंद मुनवळ्ळी यांच्यासह कॉलेजचे प्राचार्य उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.