एफएमसीजी, पीएसयू बँकांच्या कामगिरीने तेजी
बाजारात सलगची तेजी : कच्चे तेल व जागतिक बाजारांचा प्रभाव
मुंबई :
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक वधारले आहेत. यामध्ये दिग्गज कंपन्यांमध्ये अदानी समूह , एफएमसीजी, आयटी आणि पीएसयू बँक यांचे निर्देशांक तेजीत राहिल्याने भारतीय बाजाराला नवी उंची प्राप्त करण्याची संधी मिळाली.
विदेशी गुंतवणूकदारांच्याकडून होत असणारी खरेदी, कच्च्या तेलाच्या किंमतीमधील नरमाईचा कल आणि जागतिक बाजारांमधील सकारात्मक वातावरणाचा लाभ हा भारतीय बाजाराला झाला असून या कारणास्तव सलग सातव्या दिवशी बाजाराने आपली कामगिरी मजबूत ठेवली.
मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 357.59 अंकांनी वधारुन निर्देशांक 69,653.73 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 82.60 अंकांनी वधारुन 20,937.70 वर बंद झाला.
भारतीय बाजारात बुधवारच्या सत्रात सेन्सेक्समधील 20 समभाग हे वधारले आहेत. तर विप्रो, आयटीसी, लार्सन अॅण्ड टुब्रो, टीसीएस आणि टाटा मोर्ट्स यांचे निर्देशांक अव्वल स्थानी राहिले आहेत. यामध्ये सर्वाधिक नफा कमाईत विप्रोचे समभाग राहिले आहेत. अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यात सेन्सक्समधील 10 समभाग प्रभावीत होत बंद झाले. एनटीपीसी, अॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक व मारुती सुझुकी हे सर्वाधिक नुकसानीत राहिले आहेत.
पतधोरण बैठकीवर नजर
भारतीय रिझर्व्ह बँकेची द्वीमासिक पतधोरण बैठकीला बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. यामुळे आरबीआय यावेळी रेपो दरात वाढ करणार का तो आहे तसा कायम ठेवणार यावर आगामी काळातील बाजाराची दिशा निश्चत होणार आहे. मात्र बुधवार पहिल्या दिवशी तरी रेपो दरात वाढ होणार असल्याचे संकेत आरबीआय पतधोरण बैठकीमधून मिळाले नसून शुक्रवारी पतधोरण निर्णय हे सादर करण्यात आल्यावर बाजाराची आगामी दिशा निश्चित होणार आहे.