परिपूर्ण फाल्गुन...
खरंतर घरातलं शेवटचं मुल म्हणजे शेंडेफळ म्हणून कौतुक जरी होत असलं तरी ते दुर्लक्षित असतं. तसंच काहीसं या बारा महिन्यातल्या शेवटच्या ऋतूचं आणि महिन्याचं, म्हणजे फाल्गुनचं. यातलं निसर्ग सौंदर्य पारच लयाला गेलेलं असतं. पानगळतीचा कहर झालेला असतो. त्याच्यामुळे सावलीसाठी कोणीही याच्याजवळ फिरकतसुद्धा नाही. पानं गळाली तरी चिवट शेंगा मात्र झाडावर शिल्लक राहतात. वाळलेल्या शेंगा अन् त्याच्यातल्या बिया सतत खुळखुळत राहतात. त्यांच्या अंगा खांद्यावर हिरवी लुसलुशीत पानं जरी नसली तरी बारा महिन्यांचे गर्भारपण पेलण्याचं सामर्थ्य या फांदीच्या रंध्रारंध्रात साठवून ठेवलेलं असतं. फाल्गुन महिन्यात निरव शांतता, एकटेपणा, रितेपणा अनुभवाला येतो. म्हणून तर फाल्गुन धीर गंभीर वाटतो. असा हा फाल्गुन, शिशिरातला शेवटचा टप्पा पुढे सहा ऋतूंचे सहा सोहळे अनुभवण्याची रसिकता मात्र माणसात निर्माण करून जातो. म्हणून या महिन्याला रसिकतेचे रितेपण जाणवतंच. पोपटांचे हिरवेगार पंख शिरीष्याच्या फुलांच्या शोधात निघाले की समजावं फाल्गुन रावांची वर्षभराची पूर्तता झाली. शिरीषाचे गुलाबी फुल येण्याने प्रत्येक पक्षी, कीटकाला मधुशाळा उघडल्याने जगण्याची ग्वाही मिळते. अशातच नीलमोहर, ताम्हण यांचे गुच्छ आकाशाला टेकलेल्या विरक्त फांद्यांना केव्हा लगडून खाली येतात ते कळतच नाही.
फाल्गुनाची दुसरी ओळख म्हणजे मृगजळांचे महोत्सव. निसर्ग, प्राणी, पक्षी या सगळ्यांना पुढे पुढे नेणारा, सतत कार्यरत ठेवणारा हा महिना मृगजळांचा असतो. आशावाद दाखवणारा महिना म्हणजे फाल्गुन. कारण आम्ही प्रत्येकजण अशी मृगजळं शोधत जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत धावतच असतो. खरंतर या फाल्गुन महिन्यात एखादं आनंदाचं आवर्तन पूर्ण होऊन दुसरं सुरू होतांना बरोबर समेवर नेऊन ठेवणारा महिना म्हणून पाहिलं जातं. पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त करणारा महिना म्हणूनही याचं कौतुक करायला हवं. खरं तर आत्ताची त्याची अवस्था निष्पर्ण असतेच पण पुढच्या बारा महिन्यांचे सणसोहळे तो आपल्यासाठी घेऊन उभा असतो. त्याला खरंतर स्वत:ची सावली नसतेच. म्हणून स्वत:ला स्वत:ची सावली बनायला लागते. उन्हाचे पदर पांघरायला लागतात आणि आईच्या मायेने पुढच्या वर्षाची सगळी बेगमी करून ठेवावी लागते. स्वत:तलं कोरेपण निष्पर्ण अवस्था नवीन काही स्वीकारायला पाटी कोरी ठेवायची असते हे मात्र तो आवर्जून सांगून जातो. आणि मग चैत्र मात्र ऐटीत येऊन त्याच्यावर सरस्वती रेखतो. अंगा खांद्यावर पोरं बाळ झोंबावीत तशी आता या फाल्गुनाच्या शेवटी पानं फुलं... रोमा रोमांतून दिसायला लागतात. चिमण्या, पोपट, कबूतरं चावडीवर गप्पा ठोकायला यावे तसे आवाज करू लागले की समजावं, चैत्राला पायघड्या घालण्याची वेळ उंबरठ्यावर येऊन ठेपलीये. खरंतर निळ्या आकाशावर या उघड्या बोडक्या फांद्या काय लिहीत असतात कोणास ठाऊक? पण पळस पांगाराच्या आधी नील मोहराचे झुपके तुमचं लक्ष वेधून घेतात हे नक्की. अगदी आशेचं तांबडं फुटावं तसं होतं. आता पळस, पांगारा, काटेसावर, एकदम तरारून वर यायला लागलेले दिसतात. एखाद्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली की जसे लाल झेंडे लागतात तशी ही पळस पांगाराची फुलं. झाडाच्या डोक्यावरती लाल बावटा लावून उभे राहतात. रितेपणाच्या विराण्या गातांना गालावर लाली पसरावी असं काहीसं या काळात होऊन जातं. खरं तर इथे काहीच संपत नसतं आणि काहीही नवीन होत नसतं असं आश्वासन देणारा फाल्गुन आपल्याला पुन्हा पुन्हा या बारा महिन्याच्या प्रवासाला घेऊन निघतो. येणारे बारा महिने चांगलं वाईट सगळेच घेऊन येणारे असल्याने फाल्गुनाला सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं, अगदी तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे अर्थातच स्वत:कडे दुर्लक्ष होतंच. त्याच्या वाट्याला रेंगाळणारी दुपार येते, रितेपण सोसायला लागतं, मातीला, धुळीला वारंवार वंदन करून कृतज्ञ भाव जपायला लागतात. तेव्हा कुठे पुढे आकाशाला गवसणी घालणारे चैत्र वेलींचे झोके उंच नेता येतात. आपल्या स्वत:च्या वाट्याला सण समारंभ आले नाही तरी येणाऱ्या महिन्यांचे कौतुक करण्यासाठी आपल्या शुष्क फांद्या सहन करत फाल्गुन उभा असतोच. संध्यारंग रंगवताना येणाऱ्या पिढीला सुख सौभाग्य लाभावं याचा विचार करणारा स्थितप्रज्ञ म्हणून हा फाल्गुन आगळा वेगळा ठरतो...अगदी
बा. भ. बोरकरांच्या कवितेतल्या सारखं..
‘तुझ्यामुळे बारामास आलिंगतो एका क्षणी...’ असंच काहीसं....
-सौ. अद्वैता उमराणीकर