‘पेप्सिको’ भारतात 5,700 कोटींची करणार गुतवणूक
वर्ष 2030 पर्यंत भारतामधील तामिळनाडू येथे नवीन प्रकल्पाची करणार
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जागतिक अन्न आणि पेय क्षेत्रातील दिग्गज कंपनी पेप्सिको 2030 पर्यंत भारतात 5,700 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनी या रकमेचा वापर प्रामुख्याने आपल्या अन्न व्यवसायाची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी करणार आहे, अशी माहिती पेप्सिको इंडिया आणि दक्षिण आशियाचे सीईओ जागृत कोटेचा यांनी एका माध्यम संवादादरम्यान दिली.
पेप्सिकोसाठी भारत जगातील मुख्य 13 बाजारपेठांपैकी एक आहे, ज्यामुळे कंपनी येथे आपला विस्तार सातत्याने वाढवत आहे. हे प्रकल्प मध्य प्रदेश, आसाम आणि तामिळनाडूमध्ये उभारले जातील. सीईओ जागृत कोटेचा म्हणाले की, 2025 ते 2030 या वर्षांदरम्यान गुंतवण्यात येणारी 5,700 कोटी रुपयांची रक्कम प्रामुख्याने देशातील तीन राज्यांमध्ये, म्हणजेच मध्य प्रदेश, आसाम आणि तामिळनाडूमध्ये गुंतवली जाईल.
या निधीचा मोठा भाग मध्य प्रदेशात उभारल्या जात असलेल्या कॉन्सन्ट्रेट्स प्लांटवर आणि आसाम व तामिळनाडूमध्ये उभारल्या जात असलेल्या स्नॅक्स प्लांटवर खर्च केला जात आहे. पुढील काही महिन्यात दोन मोठे प्लांट कार्यान्वित केले जातील.
दक्षिण भारतीय बाजारपेठेत आपली मजबूत पकड
दक्षिण भारतीय बाजारपेठेत आपली मजबूत पकड प्रस्थापित करण्यासाठी पेप्सिकोने तामिळनाडूमध्ये पाऊल उचलले आहे. कोटेचा म्हणाले की, कंपनीने अलीकडेच तामिळनाडूमध्ये जमिनीची खरेदी पूर्ण केली आहे. या जमिनीवर एक मोठा स्नॅक्स प्लांट उभारला जाईल, ज्यामुळे कंपनीला दक्षिण भारतीय बाजारपेठेत आपली पोहोच वाढविण्यासाठी चांगली मदत होईल.
वाढते उत्पन्न आणि राजकीय स्थिरता
भारतात गुंतवणूक करण्यामागील कारणे स्पष्ट करताना, जागृत कोटेचा म्हणाले की, पेप्सिको भारताला अमर्याद क्षमतेसह एक मजबूत बाजारपेठ मानते, कारण येथे विकासाच्या प्रचंड संधी आहेत. यासाठी त्यांनी देशाचे सातत्याने वाढणारे उत्पन्न आणि भारताची राजकीय व आर्थिक स्थिरता ही मुख्य कारणे सांगितली. एक स्थिर देश असल्याने परदेशी गुंतवणुकीसाठी हे खूप सोपे होते. कंपनीला सलग दुसऱ्या वर्षी दुहेरी अंकी वाढ मिळाली.
काय म्हणाल्या सीएफओ
सीएफओ बालाचंद्रन म्हणाल्या की, खराब हवामानामुळे पेय बाजारात काहीशी मंदी होती. यासोबतच, या काळात बाजारातील स्पर्धाही लक्षणीयरीत्या वाढली आहे. असे असूनही, कंपनीच्या दोन्ही विभागांनी खूप चांगली आणि एकूणच उत्तम कामगिरी केली, असे त्या म्हणाल्या.