महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लोकप्रतिनिधी सुस्त, प्रशासन मस्त, नागरिक त्रस्त!

10:44 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खानापूर तालुक्यातील चित्र : सर्वसामान्य जनता शासकीय अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे मेटाकुटीस

Advertisement

खानापूर : तालुक्यातील सर्वसामान्य जनता शासकीय कार्यालयातील कारभारामुळे मेटाकुटीला आली आहे. जनतेची कोणतीच कामे वेळेवर होत नसल्याने जनता त्रस्त झाली असून सामान्य जनतेला वालीच नसल्याचे चित्र खानापूर तालुक्यात निर्माण झाले आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असून आमदारांनी याबाबत अवलंबलेल्या कार्यपद्धतीवर जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासकीय कार्यालयातील अधिकारी मात्र मुजोर झाल्याने सामान्य नागरिकांचे नाहक हाल होत आहेत. तालुक्यातील सर्वच कार्यालयात सावळागोंधळ सुरू आहे. आमदारांच्या कार्यपद्धतीबाबत सामान्य जनतेतून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.  तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अनागोंदी कारभाराने कळस गाठला असून, भ्रष्टाचारही उघड होत आहे. त्यामुळे सामान्य जनतेला आपली कामे करून घेण्यासाठी एजंट गाठून चिरीमिरी द्यावी लागत आहे.

Advertisement

गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील भोंगळ कारभार जगजाहीर

गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील भोंगळ कारभार जगजाहीर आहे. आता नव्याने शिक्षण वर्ष सुरू होणार आहे. यापूर्वी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना योग्य सूचना करणे गरजेचे होते. गटशिक्षणाधिकाऱ्याच्या कार्यालयातील कारभाराबाबत अनेक तक्रारी आहेत. मात्र आमदारांनी याकडे संपूर्णपणे कानाडोळा केला आहे. नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांच्या पगाराच्या बिलाविषयी गटशिक्षणाधिकाऱ्यांने आडमुठे धोरण अवलंबिले असल्याची चर्चा आहे. याबाबत सर्वत्र चर्चा असूनदेखील आमदारानी गटशिक्षणाधिकाऱ्यांना जाब विचारलेला नाही. गेल्या वर्षभरापासून गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर अनेकवेळा तक्रारी झाल्या आहेत. पोलीस स्थानकापर्यंत तक्रारी पोहचल्या आहेत. मात्र गटशिक्षणाधिकाऱ्यानी आपली कार्यपद्धत जराही बदललेली नाही.

सर्वच समस्यांकडे आमदारांचे साफ दुर्लक्ष

तहसीलदार कार्यालयातील कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. एजंटाशिवाय तहसीलदार कार्यालयात सामान्य जनतेला प्रवेशही मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील आठवड्यात तहसीलदारानी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या गेटलाच कुलूप लावले होते. तालुक्यातील सरकारी जमिनीवर अतिक्रमण होत असल्याच्या तक्रारे वाढलेल्या आहेत. याकडेही आमदारांनी पूर्णपणे कानाडोळा केल्याने तहसीलदार कार्यालयातील सर्वच अधिकारी मुजोरपणाने वागत आहेत. तालुक्यातील वैद्यकीय सेवाही रामभरोशी झाली असून, खानापूर शहरासह हलशी, नंदगड, पारिश्वाड, जांबोटी, अशोकनगर, लोंढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था सर्वश्रुत आहे. अनेक ठिकाणी डॉक्टरच नसल्याने अनेकांना वैद्यकीय सेवेसाठी खानापूर शहर गाठावे लागत आहे. त्यामुळे खानापूर दवाखान्यात रुग्णांची गर्दी होत असल्याने येथीलही सेवा योग्यप्रकारे होत नसल्याच्या तक्रारी कायम आहेत. याबाबत अनेकवेळा आमदारांकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केले आहे.

अधिकाऱ्यांना सूचना करणे गरजेचे

नगरपंचायतीच्या गैरकारभारांनाही ऊत आला आहे. यामुळे सामान्य जनता होरपळून जात आहे. नगरपंचायतीच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी असून शहरवासियांना नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यामुळे नाहक सहन करावा लागत आहे. याबाबत आमदारांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना करणे गरजेचे होते. तालुक्यातील जलजीवन योजनेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी गेल्या वर्षभरापासून झाल्या आहेत. अनेक ठिकाणी अर्धवट कामामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. याकडेही साफ दुर्लक्ष झाले आहे.

रस्ता कामांकडेही कानाडोळा

तालुक्यातील अनेक रस्त्यांची अवस्थाही दयनीय झाली आहे. वर्षभरात एकाही नव्या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. जे रस्ते झालेत ते अवघ्या वर्षभरात उद्ध्वस्त झाले आहेत. याबाबत अनेकांनी जिल्हा पंचायत तहसीलदार कार्यालयाकडे तक्रारी दिल्या आहेत. याचीही दखल आमदारांनी घेतलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अखेर दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात नव्याने हायटेक बस स्थानक निर्माण होत आहे. याबाबत वारंवार निकृष्ट दर्जाबाबत तक्रार केल्या होत्या. नव्या बस स्थानकाच्या बाजूने सर्वसामान्यांच्या सोयीसाठी रस्ता करणे गरजेचे होते. याबाबत भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कुबल यांनीही तरुण भारतकडे प्रतिक्रिया नोंदवली होती. मात्र याबाबतही आमदारांनी लक्ष दिले नाही. शहरातील आणि शासकीय कार्यालयावरील मराठी फलक हटवले आहेत. नवीन बस स्थानकावरील मराठी फलक जाणीवपूर्वक हटवण्यात आला आहे. याबाबत सर्वसामान्य मराठी जनतेने आवाज उठवला आहे.

हेस्कॉमबाबत नाराजी

हेस्कॉमच्या कारभाराबाबत गेल्या दोन वर्षभरापासून अनेकवेळा मोर्चे निवेदने आंदोलने झाली. मात्र हेस्कॉमचा कारभार काही सुधारलेला नाही. तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या वीस दिवसापासून विद्युतपुरवठा पूर्णपणे बंद असल्याने तो भाग अंधारात आहे. याकडेही दुर्लक्ष झाल्याने पश्चिम भागातील नागरिकांनी नुकताच हेस्कॉम कार्यालयावर मोठा मोर्चा काढून आंदोलन केले. मात्र अद्याप कारभार सुरळीत झालेला नाही.

बेळगाव, गोवा महामार्गाबाबत सामान्य शेतकऱ्यांना अद्याप न्याय नाही

बेळगाव, गोवा महामार्गाबाबत सामान्य शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळालेल्या नाही. याबाबत शेतकऱ्यांनी गेल्या वर्षभरात अनेकवेळा आंदोलन केले होते.  आमदारांनी हस्तक्षेप करून आंदोलन थांबवण्यात यश मिळवले. मात्र शेतकरी आजही आपल्या नुकसानभरपाई शासकीय कार्यालयाचे उंंबरे झिजवत आहेत. जमिनीचा योग्य मोबदला देण्यात येत आलेला नसून अर्धवट रस्त्यावर टोलनाका मात्र सुरू केला आहे. त्यामुळे सामान्य जनतेतून आमदारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधी सुस्त, प्रशासन मस्त, नागरिक त्रस्त अशीच म्हणण्याची वेळ आता खानापूर तालुकावासीयांवर आली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article