महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कौल जनतेचा

06:55 AM Jun 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अठराव्या लोकसभेच्या निवडणूक परिणामांनी साऱ्यांनाच कोड्यात टाकले आहे. भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाले आहे. मात्र, भारतीय जनता पक्ष मात्र बहुमतापासून दूर राहिला आहे. गेल्या निवडणुकीत 52 जागा मिळविणाऱ्या काँग्रेसने जवळपास 100 जागांची मजल मारली असली, आणि विरोधी पक्षांच्या आघाडीला जवळपास 230 जागा मिळाल्या असल्या, तरी ही जोरदार लढत अपुरी ठरली आहे. भारतीय जनता पक्षाला 240 जागा मिळाल्या असून काँग्रेसला 98 जागा प्राप्त झाल्या आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 295 जागा मिळविता आल्या आहेत.

Advertisement

राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पूर्ण बहुमत

Advertisement

 वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, राजस्थान आणि हरियाणा या पाच राज्यांमध्ये मोठा फटका बसला. त्यामुळे तो पक्ष बहुमतापासून दूर राहिला. मध्यप्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा या सहा राज्यांमधील सर्वच्या सर्व जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आहेत. मात्र, या पक्षाचा सर्वात जास्त अपेक्षाभंग उत्तर प्रदेशनेच केला आहे.

आंध्र, ओडीशात सत्तापालट

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतगणनाही करण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांमध्ये मतगणना रविवारी करण्यात आली. आंध्र प्रदेशात सत्तापालट झाला असून चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देशम या पक्षाने प्रचंड बहुमत मिळवून जगनमोहन रे•ाr यांच्या वायएसआर काँग्रेसचा पराभव केला. 175 जागांपैकी तेलगु देशमला 132, जनसेना पक्षाला 20 तर भारतीय जनता पक्षाला 8 जागा मिळाल्या आहेत. वायएसआर काँग्रेसला केवळ 10 जागा मिळाल्याने त्या पक्षाचा धुव्वा उडाला. या राज्यात तेलगु देशम, भारतीय जनता पक्ष आणि जनसेना पक्ष यांची युती होती. या युतीला लोकसभेतही मोठे यश मिळाले असून 25 जागांपैकी 21 जागा मिळाल्या आहेत. तेलगु देशमला 16, भारतीय जनता पक्षाला 5 तर जनसेना पक्षाला 2 जागा मिळाल्या आहेत. वायएसआर काँग्रेसला केवळ चार जागा हाती लागल्या.

ओडीशात भाजपची सत्ता

ओडीशामध्ये गेली 25 वर्षे असणारी नवीन पटनाईक यांची सत्ता संपुष्टात आली आहे. या राज्यातील 147 जागांपैकी 80 जागा भारतीय जनता पक्षाने पटकाविल्या असून पूर्ण बहुमत मिळविले आहे. या राज्यातील लोकसभेच्याही 21 पैकी 19 जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या असून मोठे यश प्राप्त केले आहे. बिजू जनता दलाला लोकसभेची केवळ 1 जागा मिळवता आली आहे. त्यामानाने या पक्षाला विधानसभेत बऱ्यापैकी जागा मिळाल्या आहेत.

कोणत्याही पक्षाला बहुमत नाही

या निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही पक्षाला बहुमत दिलेले नाही. भारतीय जनता पक्ष बहुमतापासून 32 जागा दूर राहिला. काँग्रेसलाही साधारणत: पावणेदोनशे जागा बहुमतासाठी कमी पडल्या. विरोधी पक्षांच्या आघाडीला बहुमतासाठी 45 जागा कमी पडत आहेत. विरोधी पक्षांच्या पूर्ण आघाडीला जितक्या जागा मिळाल्या आहेत, त्यापेक्षा अधिक जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आहेत. तथापि, सरकार स्थापन करण्यासाठी या पक्षाला आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील इतर पक्षांचे साहाय्य घेणे आवश्यक ठरणार आहे.

आज रालोआची बैठक

आज बुधवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पुढील रणनिती निर्धारित केली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींकडे सरकार स्थापनेची अनुमती मागण्याच्या संदर्भातही कोणती पावले उचलण्यात यावीत यासंबंधी विचारविमर्ष होण्याची शक्यता आहे. सरकार स्थापनेच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्वाची असेल.

विरोधी आघाडीचीही बैठक

विरोधी आघाडीचीही बैठक येत्या एक दोन दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. सरकार स्थापनेसाठी या आघाडीला साधारणत: 40 जागा कमी पडत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून कुमक मिळाल्याशिवाय ही आघाडी सरकार स्थापना करु शकत नाही. त्यामुळे या आघाडीच्या पुढील हालचाली कशा होतात, याकडे साऱ्यांचे लक्ष पुढचे काही दिवस लागून राहण्याची शक्यता आहे.

सर्वात मोठा विजय

या निवडणुकीत सर्वात मोठे मताधिक्क्य मध्यप्रदेशातील इंदूर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शंकर ललवाणी यांनी मिळविले आहे. त्यांनी आपल्या काँग्रेस प्रतिस्पर्ध्याचा 11 लाख 75 हजार मतांच्या अधिक्क्याने पराभव केला. याच पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान हे देखील 8 लाखांच्या मताधिक्क्याने याच राज्यातील विदिशा मतदारसंघात विजयी झाले आहेत.

पंतप्रधान मोदी यांचे मताधिक्क्य घटले

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या वाराणसी मतदारसंघातून साधारणत: 1 लाख 60 हजार मतांनी विजयी झाले आहेत. मात्र गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांचे मताधिक्क्य यावेळी बरेच घटल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशात एकंदरीतच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वातावरण असल्याने त्याचा परिणाम वाराणसी मतदारसंघावरही झाल्याचे दिसून आले आहे.

पुढे काय होणार ?

या निवडणूक परिणामाने राजकीय अस्थिरतेला जन्म दिला आहे. त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणता निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष आता लागणार आहे. सर्वसाधारण पायंड्यानुसार सर्वात मोठ्या पक्षाला आधी सत्ता स्थापनेची संधी दिली जाते. शिवाय राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे बहुमत असल्याने या आघाडीच्या नेत्याला सत्तास्थापनेचे आमंत्रण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

रस्सीखेच होण्याची शक्यता

राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाले असले तरी या आघाडीतून काही पक्ष बाहेर काढण्याची तयारी विरोधी पक्षांकडून केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल आणि चंद्राबाबू नायडू यांचा तेलगु देशम यांच्याकडे अनुक्रमे 12 आणि 16 जागा आहेत. या 28 जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे स्थैर्य अवलंबून आहे, असेही तज्ञांचे म्हणणे आहे.

उत्तर प्रदेशात भाजपला सेटबॅक, सप-काँग्रेसची मुसंडी

त्तरप्रदेशात यावेळी भाजपविरोधात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने आघाडी करत निवडणूक लढविली होती. लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने 37 जागा पटकाविल्या आहेत. तर काँग्रेसला 6 जागांवर यश मिळाले आहे. तर भाजपने रालोद, अपना दल (एस) सोबत आघाडी करत निवडणूक लढविली होती. राज्यात एकेकाळी सत्तेवर राहिलेला बहुजन समाज पक्ष यावेळी पूर्णपणे निष्प्रभ ठरला आहे.

उत्तरप्रदेशात भाजपचे अनेक मोठे नेते पराभूत झाले आहेत. सर्वात लक्षवेधी मतदारसंघ असलेल्या अमेठीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना काँग्रेसचे उमेदवार किशोरीलाल शर्मा यांच्याकडून पराभव पत्करावा लागला आहे. मुजफ्फरनगर येथे केंद्रीय मंत्री संजीव बालियान आणि खेरी मतदारसंघात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांना पराभूत व्हावे लागले आहे. गाझीपूरमध्ये मुख्तार अंसारीच्या तुरुंगातील मृत्यूनंतर त्यांचे बंधू अफजाल अंसारी यांना सहानुभूतीच्या लाटेमुळे विजय मिळविता आला आहे. उन्नाव येथे भाजप नेते साक्षी महाराज यांना निसटता विजय मिळाला आहे.

‘युपी के लडकों’ का कमाल

उत्तरप्रदेशात 7 वर्षांनी पुन्हा समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने मिळून निवडणूक लढविली होती. दोन्ही पक्ष 2017 मध्ये एकत्र आले हेते, परंतु तेव्हा ही आघाडी फारशी चमकदार कामगिरी करू शकली नव्हती. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत सप-काँग्रेस आघाडीला 60 जागाही जिंकता आल्या नव्हत्या. त्यावेळी अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्या जोडीला ‘युपी के लडके’ म्हटले जात होते. युपी के लडके 7 वर्षांनी 2024 मध्ये पुन्हा एकत्र आले, दोन्ही पक्षांदरम्यान आघाडी देखील सहजपणे झाली नव्हती. सप आणि काँग्रेस या दोघांसाठीही ही ही आघाडी लाभदायक ठरली आहे.

कुठला मुद्दा ठरला निर्णायक?

लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशातील सप-काँग्रेसच्या विजयासाठी अनेक घटक कारणीभूत ठरले आहेत. अखिलेश यादव यांनी पीडीएचा नारा दिला होता, जो प्रभावी ठरला आहे. पीडीए म्हणजे पीडित, दलित आणि अल्पसंख्याक. या नाऱ्याद्वारे पीडित, दलित आणि अल्पसंख्याकांची मते एकजूट करण्याचा प्रयत्न सपने केला. ‘पीडीए च इंडिया आहे’ अशी घोषणा सपने दिली होती. तर राहुल गांधींनी ‘जितनी आबादी, उतना हक’चा नारा देत दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांना एकत्र आणण्यास यश मिळविले आहे. एमएसपीच्या हमीवरून शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचा मुद्दाही या निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरला आहे. शेतकरीवर्गाने सप-काँग्रेस आघाडीच्या बाजूने प्रामुख्याने मतदान केल्याचे मानले जात आहे.

भाजपला विरोधात काय गेले?

उत्तरप्रदेशात भाजपच्या विरोधात अनेक मुद्दे गेले. या निवडणुकीत अग्निवीर योजना आणि पेपर लीक हे मोठे मुद्दे ठरले होते, यामुळे भाजपला फटका बसला आहे. अखिलेश आणि राहुल गांधी एकत्र आल्यानेही भाजपला मोठे नुकसान झाले आहे. दोघांची जोडी उत्तरप्रदेशात हिट ठरली आहे. या दोन्ही नेत्यांनी उत्तरप्रदेशात आरक्षण, रोजगार, पेपरलीक, अग्निवीर आणि घटनेचा मुद्दा जोरदारपणे मांडला आहे. याचबरोबर भाजपला सत्ताविरोधी लाटेमुळे नुकसान सहन करावे लागले आहे. तसेच भाजपकडून उमेदवार निवडीत चूक झाल्याची चर्चा सुरू आहे.

रायबरेली, अमेठीत काँग्रेसला यश

राहुल गांधी मागील वेळी पराभूत झालेल्या अमेठी मतदारसंघात काँग्रेसने यावेळी मात्र यश मिळविले आहे. तर रायबरेली या काँग्रेसच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात राहुल गांधी यांनी दिमाखदार विजय मिळवित भाजपच्या अपेक्षांना सुरुंग लावला आहे.  याचबरोबर सहारनपूरमध्ये इमरान मसूद, सीतापूरमध्ये राकेश राठौड, रायबरेलीत राहुल गांधी, अमेठीत किशोरीलाल शर्मा, अलाहाबाद (प्रयागराज)मध्ये उज्जवल रमण सिंह, बाराबंकी मतदारसंघात तनुज पुनिया हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.

गुजरातचा गढ अभेद्य, पण!

निवडणुकीत राजपूत आणि अन्य एक दोन समाजघटकांच्या नाराजीचा फटका भारतीय जनता पक्षाला बसणार, अशी हवा काही ‘तज्ञां’कडून उठविण्यात आली होती. त्यामुळे एक-दोन मतदारसंघ या पक्षाला गमवावे लागू शकतात. वनवासी समाजामध्येही मोठा असंतोष आहे, असे बोलले गेले होते. तथापि, सर्व हिंदू समाजघटक भारतीय जनता पक्षाच्याच पाठीशी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मतांमध्ये किंचित घसरण

भारतीय जनता पक्षाने गुजरातमध्ये सर्व जागा जिंकण्याचा विक्रम केला असला तरी, 2019 च्या तुलनेत या पक्षाला पडलेल्या मतांचे प्रतिशत प्रमाण,  किंचित कमी झाल्याचे दिसून आले आहे. 2019 मध्ये या पक्षाला 62.21 प्रतिशत मते मिळाली होती. यावेळी हे प्रमाण 61.89 प्रतिशत इतके राहिले. तरी ते 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत अधिकच आहे, असे आकडेवारी सांगत आहे.

युत्या आणि आघाड्या

यावेळी गुजरातमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात युती झाली होती. हे दोन्ही पक्ष विरोधकांच्या आघाडीचे सदस्य पक्ष आहेत. राज्यातील 2022 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने प्रथमच गुजरातमध्ये निवडणूक लढविली होती. यावेळी दोन मतदारसंघात हा पक्ष होता. तथापि, या आघाडीची डाळ या राज्यात मुळीच शिजली नाही, असे परिणामांवरुन स्पष्ट होत आहे.

काँग्रेसने खाते खोलले

बनासकांठा या अल्पसंख्याक मतदारांची संख्या लक्षणीय असलेल्या मतदारसंघात विजय मिळवित भाजपची घौडदौड रोखली आहे. बनासकांठा येथे गेनीबेन ठाकोर यांनी भाजपच्या उमेदवार रेखाबेन चौधरी यांना 30,406 मतांनी पराभूत केले आहे. बनासकांठामध्ये मिळालेल्या या यशामुळे काँग्रेसला राज्यात काहीसा दिलासा मिळाला.

अमित शहा

राज्यातील गांधीनगर या मतदारसंघाकडे साऱ्यांचे लक्ष वेधले गेले होते. येथून केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा हे 7,44,716 मतांच्या प्रचंड मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेस उमेदवार सोनल पटेल यांचा पराभव केला. शहा यांना एकंदर मतांच्या 66 टक्के मते पडली आहेत. या मतदारसंघातून ही त्यांची प्रथमच निवडणूक होती, जी त्यांनी जिंकली आहे.

मुकेश दलाल

मतदान होण्याआधीच या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने निर्विरोध विजय प्राप्त केला आहे. या पक्षाचे उमेदवार मुकेश दलाल यांच्या विरोधातील सर्व आठ अपक्ष उमेदवार आणि बहुजन समाज पक्षाने माघार घेतली. तसेच काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभाणी यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला गेला. त्यामुळे मतदानापूर्वीच भारतीय जनता पक्षाने या लोकसभेची प्रथम जागा जिंकली आहे.

मनसुख मांडविया

कोरोना काळात आपल्या कार्यक्षमतेचा परिचय दिलेले केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी पोरबंदर मतदारसंघातून मोठा विजय मिळविला आहे. त्यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे ललित वासोया यांचा 3,60,360 च्या मताधिक्क्याने पराभव केला. मांडविया यांची ही प्रथमच लोकसभा निवडणूक आहे.  समाजवादी पक्षाचे नीलेश शेखावा यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article