For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

पीपल्स हायस्कूलची इमारत सुरक्षित; नियम व परवान्यांचे पालन करून बांधकाम : व्यवस्थापकीय ट्रस्टी राहुल देशपांडे यांची माहिती

11:29 AM Oct 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
पीपल्स हायस्कूलची इमारत सुरक्षित  नियम व परवान्यांचे पालन करून बांधकाम   व्यवस्थापकीय ट्रस्टी राहुल देशपांडे यांची माहिती
Advertisement
पणजी : पणजी येथील नामांकित पीपल्स हायस्कूलची इमारत पूर्णपणे सुरक्षित असून, इमारतीचे बांधकाम आवश्यक नियम आणि परवान्यांचे पालन करून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पीपल्स एज्युकेशनल ट्रस्टचे व्यवस्थापकीय ट्रस्टी राहुल देशपांडे यांनी ‘दै. तरुण भारत’च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

शाळेच्या इमारतीच्या सुरक्षिततेबाबत व्यक्त करण्यात येणाऱ्या शंकांवर स्पष्टीकरण देताना देशपांडे यांनी हे दावे फेटाळून लावले. इमारतीतील मधल्या मजल्यासंदर्भातील कागदपत्रे पणजी नियोजन व विकास प्राधिकरणाकडे (पीडीए) असून, त्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

90 वर्षांची शैक्षणिक परंपरा

पीपल्स हायस्कूलला सुमारे 90 वर्षांची समृद्ध शैक्षणिक परंपरा लाभली आहे. या काळात अनेक नामवंत व्यक्तींनी या संस्थेत शिक्षण घेतले असून, पालकांचा संस्थेवर दीर्घकाळापासून विश्वास राहिला आहे. शिक्षकवर्ग आणि व्यवस्थापन यांच्या योगदानातून शाळेने अनेक दशके शैक्षणिक सेवा अखंडितपणे सुरू ठेवली आहे, असे देशपांडे यांनी सांगितले.

शाळेच्या इमारतीबाबत करण्यात येणारे आरोप चुकीचे आणि तथ्यहीन असल्याचे सांगत, या विषयाकडे अफवा किंवा चर्चेच्या आधारे न पाहता अधिकृत कागदपत्रे आणि वस्तुस्थितीच्या आधारे पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

अग्निसुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना

विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन शाळेत अग्निसुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 4 मे 2026 रोजी अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी केली होती. या वेळी अग्निशमन विभागाच्या निरीक्षकांकडून आवश्यक परवानगी आणि स्वाक्षऱ्या नियमानुसार घेण्यात आल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली.

आगीसारखी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढणे आणि शिक्षक व कर्मचाऱ्यांनी योग्य पद्धतीने प्रतिसाद देणे महत्त्वाचे असते. यासाठी शाळेत दरवर्षी मॉक ड्रिलचे आयोजन केले जाते. या सरावातून विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी, सुरक्षित बाहेर पडण्याचे मार्ग आणि सूचनांचे पालन करण्याचे महत्त्व समजते, असे देशपांडे यांनी नमूद केले.

प्रतिष्ठित माजी विद्यार्थ्यांची गौरवशाली परंपरा

पीपल्स हायस्कूलने अनेक नामवंत व्यक्तींना घडविले आहे. गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री स्व. शशिकलाताई काकोडकर, मंत्री विश्वजीत राणे, रोहन खंवटे, सिद्धार्थ कुंकळकर, निर्मला सावंत आणि श्रीनिवास धेपो यांसारख्या व्यक्तींचा शाळेच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये समावेश असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

शाळेच्या इमारतीच्या सुरक्षिततेबाबत निर्माण झालेल्या चर्चेमुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीती अथवा संभ्रम निर्माण होऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि पोषक शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे ही संस्थेची महत्त्वाची जबाबदारी असून, त्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.