जयंतरावांच्या भूमिकेकडे लोकांचे लागले लक्ष
इस्लामपूर :
विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातच मुंबईत झालेल्या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी आमदार पाटील यांना बाजूला करुन नव्या चेहऱ्यांना प्रदेशाध्यक्षपदी संधी द्यावी, असा सूर आळवला. आमदार पाटील यांची पक्षात घुसमट सुरु आहे. दरम्यान आमदार पाटील हे भाजप किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीत जातील, अशा वावड्या उठल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पाटील हे काय भूमिका घेणार, याकडे मतदारसंघातील लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जयंत पाटील यांना प्रदीर्घ काळ प्रदेशाध्यक्षपदाची संधी दिली. या काळात त्यांनी संपूर्ण राज्यात पक्षबांधणीसाठी वेळ दिला. हल्लाबोल यात्रा, शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला. लोकसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादीने घवघवीत यश मिळवले. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी केलेल्या जा]िहरातबाजीने आमदार रोहित पवार यांचा ‘इगो’ जागा झाला. एका समारंभात पवार यांनी ते कुणा एकट्यादुकट्याचे यश नसून सामुहिक यश असल्याचे सांगून जयंतरावांना टार्गेट केले. पवार घराण्यातून पूर्वी जयंतराव व अजितदादा यांच्यात विळ्या-भोपळ्याचे सख्य होते. अजितदादा पक्षातून बाहेर पडल्यानंतर रोहित पवार यांच्या रुपाने जयंत पाटील यांना लक्ष्य करण्यात आले.
या वादावर पडदा पडून विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत पक्षाची बरीच घसरण झाली. खुद्द आमदार पाटील यांचा काठावर विजय झाला. त्यांचे मताधिक्य घटले. या आत्मचिंतनात जयंतराव व त्यांचे समर्थक असतानाच मुंबईत झालेल्या बैठकीत जयंतरावांना प्रदेशाध्यक्षपदावरुन बाजूला करुन नवोदितांना संधी देण्याची मागणी काही पदाधिकाऱ्यांनी केली. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह काही मोजक्या सहकाऱ्यांनी जयंतरावांना समर्थन दिले. त्यांनी रोहित पवार व जयंतरावांत कसलेच मतभेद नसल्याचा दुजोराही दिला. जयंतरावांनी बाजूला होण्यासाठी आठ दिवसाची वेळ मागून घेतली. यावर शरद पवार यांनी प्रस्थापितांना संधी नको, 60 ते 70 टक्के तरुणांना संधी देवू, तसेच 50 टक्के महिलांना पक्ष संघटनेच्या कामात सामिल करुन घेवू, आणि दुसरी फळी भक्कम करु, असे वक्तव्य केले.
या संपूर्ण नाट्यानंतर आमदार पाटील यांच्या समर्थकांत अस्वस्थता आहे. आमदार पाटील यांनीही मतदारसंघात पक्ष मजबुतीच्या निमित्ताने प्रमुख पदाधिकारी, महिला पदाधिकारी यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या. तसेच मताधिक्य घटीचेही आत्मचिंतन केले. दरम्यान, त्यांनी प्रसार माध्यमांनाही या बैठकांपासून दूर ठेवले. त्यामुळे नेमका कुठल्या मुद्यावर खल झाला, हे गुलदस्त्यात राहिले आहे. याचवेळी मतदारसंघात जयंतराव हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या वावड्या उठल्या. मात्र यामध्ये कितपत तथ्य आहे, हे पहावे लागणार आहे. आमदार पाटील नेमका काय निर्णय घेणार याकडे लोकांचे लक्ष लागून आहे.