आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून लोक इतर दैवतांना भजतात
अध्याय सातवा
भगवंत म्हणाले, मला अत्यंत प्रिय असलेला ज्ञानी भक्त जिकडे पाहतो, तिकडे त्याला माझ्याशिवाय दुसरे काही दिसत नाही. त्याला आपणच विश्व आहोत असे भासते. या सर्व विश्वात वासुदेव भरला आहे याचा पूर्ण अनुभव तो घेत असल्याने भक्तांमध्ये तोच सर्वश्रेष्ठ आणि तोच ज्ञानी होय. असा महात्मा फार दुर्लभ असतो. भगवंत पुढील श्लोकात म्हणतात, ज्ञानी भक्त सोडून इतरही पुष्कळजण मला भजत असतात पण त्यांची भक्ती फक्त प्रापंचिक गोष्टींच्या प्राप्तीसाठी असते. त्या त्यांना माझ्याकडून मिळतील अशी खात्री नसल्याने ते त्यासाठी अन्य दैवते शोधतात.
भ्रमले कामना-ग्रस्त धुंडिती अन्य दैवते । स्वभाव-वश होऊनि तो तो नियम पाळिती ।।20।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, ज्ञानी सोडून अन्य भक्त विषयांध झालेले असल्याने त्यांना विषयसुखाची आशा आणि कर्मफलाची हाव सुटलेली असते. त्यामुळे त्यांच्याकडे असलेला ज्ञानरुपी दिवा मालवतो आणि त्यांच्या जीवनात अंतर्बाह्य अंधार होतो. त्यांना हव्या असलेल्या गोष्टी आणि त्या मिळण्यासाठी परिस्थितीची अनुकुलता अन्य देवांना भजून मिळेल असे त्यांना वाटते आणि तेच आपले तारणहार आहेत असे वाटून त्यांच्या स्वभावानुसार ते अन्य देवांना सर्वभावे भजू लागतात.
इथं माउली आपल्याला एक मोठ्ठी दिलासादायक बाब सांगतात ती अशी की, भगवंत कायम आपल्याजवळ असतात. फक्त आपण त्यांना प्रकट होण्यासाठी निरपेक्षतेने कर्मे करून त्यांना सर्वभावाने भजणे आवश्यक आहे. ते आपले तारणहार असून आपल्या जीवनातील घटना, त्यांच्या इच्छेनुसार घडत असतात आणि त्या आपल्या हिताच्या असतात. आपल्या जीवनाला आवश्यक असलेल्या आणि आपले हित साधून देणाऱ्या गोष्टी आपण न मागताही आपल्यापर्यंत ते हस्ते परहस्ते पोहोचवत असतात. खास त्यासाठी निर्माण केलेल्या सृष्टीचक्राची माहिती भगवंतांनी गीतेच्या तिसऱ्या अध्यायात दिलेली आहे. ह्यावर विश्वास नसलेले भक्त त्यांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी अन्य दैवतांच्या भजनी लागतात. अगोदरच ते मायेच्या आधीन आणि फलप्राप्तीकरिंता दीन झालेले असतात. इच्छित फळ मिळावे म्हणून मोठ्या कौतुकाने लंपट होऊन देवाची भक्ती करू लागतात. यथाविधि, त्याला काय काय वस्तु अर्पण केल्या पाहिजेत इकडे लक्ष देऊन, त्याला त्याच्या आवडीचे उपचार करतात! जेणेकरून त्या दैवताने प्रसन्न होऊन आपल्याला हवी असलेली गोष्ट द्यावी. थोडक्यात ही देवांबरोबर केलेली एकप्रकारची देवघेवच असते.
येथे ते हे लक्षात घेत नाहीत की, इतर देव ही परमेश्वराची निर्मिती असून त्यांनी सृष्टीचा व्यवहार व्यवस्थित चालावा म्हणून प्रत्येकाला कामे नेमून दिलेली आहेत. उदाहरणार्थ ब्रम्हा विष्णू महेश हे त्यातील प्रमुख देव असून ते अनुक्रमे सृष्टी निर्माण करण्याचे, तिचे पालन करण्याचे व संहार करण्याचे काम करत असतात. त्याचप्रमाणे इतर देवांनाही परमेश्वराने कामे नेमून दिलेली आहेत.
क्रमश: