लोक नानाप्रकारच्या देवांची भक्ति करतात
अध्याय सहावा
बाप्पा म्हणाले, जीवनातून स्वबळावर मायेला दूर करणे अशक्य आहे हे लक्षात आल्यावर मायेच्या कचाट्यातून सुटण्यासाठी साधक मला शरण येतात. परंतु ही सुद्धा अनेक जन्मांची तपश्चर्या आहे कारण जरी मनुष्य ईश्वराला शरण गेला तरी त्याला कोणत्या गोष्टीचा केव्हा मोह पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे तो जरी मला शरण आला असला तरी पुन:पुन्हा मोहाच्या गर्तेत सापडून प्रवाहपतीत होऊ शकतो. मोहपाशातून दूर होण्यासाठी संपूर्ण निरपेक्षता अंगी बाणवावी लागते. हा जन्मजन्मांतरीचा प्रवास असला तरी तो अत्यंत आनंददायी असल्याने कधीही कंटाळवाणा होत नसल्याने परम धामाकडे जायच्या वाटचालीचे श्रम जाणवत नाहीत. या प्रवासाचे टप्पे कसे असतात ते बाप्पा पुढील काही श्लोकातून सांगत आहेत.
अन्ये नानाविधान्देवान्भजन्ते तान्व्रजन्ति ते ।
यथा यथा मतिं कृत्वा भजते मां जनोऽ खिलऽ ।।13 ।।
तथा तथास्य तं भावं पूरयाम्यहमेव तम् ।
अहं सर्वं विजानामि मां न कश्चिद्विबुध्यते ।। 14।।
अर्थ-काही लोक नानाप्रकारच्या देवांची भक्ति करतात व त्या त्या देवाप्रत ते जातात. जशी बुद्धि होईल त्याप्रमाणे लोक माझी भक्ति करतात. त्यांचा तो तो भाव अथवा इच्छा मी पूर्ण करतो. मी सर्वांना जाणतो पण मला कोणीही जाणत नाहीत.
विवरण-प्रथम मनुष्य स्वबळावर सर्व गोष्टी मिळवण्यासाठी धडपडतो पण कालांतराने असं लक्षात येतं की, सर्व गोष्टी तो स्वबळावर मिळवू शकत नाही. मग त्या मिळवण्यासाठी तो ईश्वराकडे सहाय्य मागतो. त्याची भक्ती करू लागतो. अशा पद्धतीने त्याची ईश्वराकडे जाण्याची वाटचाल सुरू होते. त्याच्या आवडीच्या देवाची तो भक्ती करू लागतो. त्याला असं वाटत असतं की, ती दैवते त्याच्या इच्छा पूर्ण करतील. अर्थात ही सर्व ईश्वराचीच सगुण रूपे असल्याने त्यांनी मागितलेले ईश्वर त्यांना देतातही पण त्यांच्या अल्पबुद्धीमुळे त्यांनी मागितलेली फळे कायम टिकणारी नसतात. तरी पण बहुतेक जण काही ना काही मिळवण्यासाठी भक्ती करत असल्याने त्या त्या देवतेच्या हातून त्यांना हवे असलेले फळ ईश्वर देत असतो. कुणाच्या मनात काय आहे, कुणाला माझ्याकडून काय हवंय हे सर्व ईश्वर जाणून असतो पण खेदाची गोष्ट अशी की, ईश्वराला जाणून घेण्याचा कुणीच प्रयत्न करत नाहीत. ईश्वराचे स्वरूप निर्गुण, निराकार आहे. परंतु हे लक्षात न घेता त्याने ह्या विश्वाचे संचालन सुसूत्रतेने चालावे म्हणून विविध देवी, दैवतांची सगुण रुपात निर्मिती केलेली आहे. हे सर्व ईश्वराचे सहाय्यकारी असतात परंतु सामान्य मनुष्य त्यांनाच ईश्वरस्वरूप मानून त्यांची पूजा करत असतो. त्यांनी प्रसन्न होऊन दिलेली फळे कायम टिकणारी नाहीत हे लक्षात आले की, मग मात्र तो निर्गुण, निराकार ईश्वरीस्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांची सुरवात निरपेक्ष होण्यातून होते. ईश्वर माझा दाता आहे, त्राता आहे, त्याने माझ्या गरजा भागवण्याची जबाबदारी घेतलेली आहे ह्यावर ठाम विश्वास ज्याला वाटतो, त्याला निरपेक्ष होणे सोपे जाते. ईश्वरावर असा विश्वास ज्यांचा असतो ते धन्य होत. कारण त्यांना ईश्वरीतत्व समजलेलं असतं. अशा भक्तांचा स्वभाव सात्विक असतो. ईश्वराची भक्ती करण्यात गढून जातात, त्यांच्या मनात ईर्षा, असूया यांना स्थान नसतं. ते सर्वत्र समदृष्टीने पाहू लागतात, ज्यांच्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते निरपेक्षतेने करू लागतात, जसजशी ते ईश्वराची भक्ती करू लागतात तसतशी त्यांना सर्वत्र ईश्वरी अस्तित्वाची जाणीव होऊ लागते. त्यांची आध्यात्मिक उन्नती होऊ लागते व ते अधिकाधिक प्रगत होऊन भक्ती करू लागतात. त्यांच्या जीवनशैलीत हळूहळू परिवर्तन होऊ लागते.