For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जनता आम्हाला पुन्हा संधी देईल!

07:00 AM Apr 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
जनता आम्हाला पुन्हा संधी देईल
Advertisement

भाजपच्या स्थापना दिनी पंतप्रधान मोदींचा आत्मविश्वास : देशभरातील कार्यकर्त्यांना शुभेच्छा

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचा शनिवार, 6 एप्रिलला 45 वा स्थापना दिवस साजरा झाला. 6 एप्रिल 1980 रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची स्थापना झाली. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी भाजपच्या 44 वर्षांचा उल्लेख करतानाच देशातील जनता येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा विजयाची संधी देईल, असा आशावाद व्यक्त केला. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी पक्षाला बळ देणाऱ्या सर्व महान व्यक्तिमत्त्वांना श्र्रद्धांजली अर्पण केली. देशात पक्ष वाढवण्यासाठी अनेक नेत्यांचे योगदान असून वर्षानुवर्षे आपल्या कष्टाने, संघर्षाने आणि बलिदानाने त्यांनी पक्षाला नव्या उंचीवर नेले आहे. आज मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो की भाजप हा देशातील सर्वात आवडता पक्ष असून तो ‘नेशन फर्स्ट’ हा मंत्र घेऊन जनतेची सेवा करण्यात मग्न असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला.

Advertisement

सुशासन हीच भाजपची दृष्टी

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की भाजप नेहमीच विकासात्मक दृष्टी, सुशासन आणि राष्ट्रवादी मूल्यांसाठी समर्पित आहे. 140 कोटी देशवासीयांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस काम करणारे भाजपचे सर्वात मोठे बलस्थान आहे. देशातील तऊण भाजपकडे आशावादी नजरेने पाहत असल्यामुळेच त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी आम्ही सक्षमपणे लढा देत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.

प्रत्येक देशवासीयाचे जीवन सुकर करा

केंद्र असो की राज्य, आमच्या पक्षाने सुशासनाची नव्याने व्याख्या केली आहे. आमच्या योजना आणि धोरणांमुळे देशातील गरीब आणि वंचित बंधू-भगिनींना नवीन बळ मिळाले आहे. अनेक दशकांपासून दुर्लक्षित राहिलेल्या लोकांना भाजपमध्ये आशेचा मोठा किरण दिसला. त्यांचा मजबूत आवाज म्हणून भाजप पुढे आला. आम्ही नेहमीच सर्वांगीण विकासासाठी काम केल्यामुळे प्रत्येक देशवासीयांचे जीवन सुसह्य झाल्याचेही पंतप्रधान पुढे म्हणाले.

भाजप भ्रष्टाचार, घराणेशाहीपासून मुक्त

आमचा पक्ष देशाला भ्रष्टाचार, घराणेशाही, जातीयवाद आणि व्होट बँकेच्या राजकारणापासून मुक्त करण्यासाठी झटत आहे. अनेक दशके राज्य करणाऱ्या पक्षांनी ही राजकीय संस्कृती देशाची ओळख बनवली होती. नव्या भारतातील स्वच्छ आणि पारदर्शक कारभारामुळे विकासाचे फायदे आज शेवटच्या टप्प्यावर उभ्या असलेल्या गरिबांपर्यंत कोणताही भेदभाव न करता पोहोचत आहेत, असेही ते पुढे म्हणाले.

एनडीएचा भाग असल्याचा अभिमान

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आम्हालाही एनडीएचा अविभाज्य भाग असल्याचा अभिमान आहे, कारण ही आघाडी देशाची प्रगती आणि प्रादेशिक आकांक्षा सोबत घेऊन भारताला पुढे नेण्यात विश्वास ठेवते. एनडीए ही अशी युती आहे, जी देशाच्या विविधतेच्या सुंदर रंगांनी सजलेली आहे. आमची ही आघाडी खूप महत्त्वाची असून आगामी काळात आमची युती आणखी मजबूत होईल, असा दावाही पंतप्रधानांनी केला. देशातील जनता नवी लोकसभा प्रतिनिधी निवडण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. देशभरातील माझे कुटुंबीय आम्हाला आणखी एका कार्यकाळासाठी आशीर्वाद देतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. आमच्या विजयामुळे गेल्या दहा वर्षात आम्ही विकसित भारतासाठी रचलेल्या पायाला नवीन बळ मिळणार असा दावाही त्यांनी केला. तसेच सरकार आणि जनता यांच्यातील विकासाचा सर्वात मजबूत दुवा असलेल्या भाजप आणि एनडीएच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा माझ्या शुभेच्छा देतो, असे पंतप्रधान म्हणाले.

Advertisement
Tags :

.