शिवसेनेच्या निलम शिंदेनी उबाठाच्या हरी खोबरेकर यांना सुनावले
मेळाव्यावरून केलेल्या टिकेचा घेतला समाचार : लाडक्या बहिणींच्या अपमानाचे उत्तर जनता मतदानातून देणार
मालवण | प्रतिनिधी : कुडाळ येथे शिवसेना महायुतीचा मेळावा रेकॉर्डब्रेक उपस्थितीत संपन्न झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. नारायण राणे, मंत्री दीपक केसरकर, मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी खासदार निलेश राणे यांनी हाती धनुष्यबाण घेत शिवसेनेत प्रवेश केला. या मेळाव्यातील गर्दी पाहून ठाकरे गटाच्या पायाखालची जमिन सरकली आहे. निवडणुकीतील पराभव त्यांना दिसू लागला असून ठाकरे गटाचे पदाधिकारी विचलित होऊन बेताल वक्तव्य करत आहेत. अशी टीका शिवसेना महिला आघाडी उपाजिल्हा प्रमुख निलम शिंदे यांनी केली आहे.
ठाकरे गट मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनीही मेळाव्यावर टीका केली आहे. त्याचाही समाचार निलम शिंदे यांनी घेताना हरी खोबरेकर यांना सुनावले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमापोटी अर्थात आपल्या लाडक्या भावाचे स्वागत करण्यासाठी आभार मानण्यासाठी या मेळाव्यात महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या. आमच्या साहेबांनी महिलांसाठी अतिशय चांगल्या योजना आणल्या आणि त्याची पूर्तता केली. महिलांच्या रोजगाराची किंवा त्यांच्या उपजिविकेची दखल घेतली. आमच्या "लाडक्या भावाने" सिद्ध करून दाखवले की हे सर्वासामान्य जनतेचे सरकार आहे. त्यामुळे हरी खोबरेकर बोलताना जरा विचार करूनच बोला. आता तुमचे आमदार यांचा कालावधी संपण्याचे थोडेच दिवस राहिलेत. पायाखालची जमीन सारखतेय म्हणून काहीही बरळू नका 'शिव धनुष्य' कोणी पेलवले हे निलेश राणे यांच्या रूपातून दिसेलच. असाही ठाम विश्वास निलम शिंदे यांनी व्यक्त केला.
'लाडक्या बहिणींचा' अपमान करताय याचे उत्तर माता भगिनी मतदानातून देतील असेही निलम शिंदे यांनी सांगितले.
शिवसेना महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष वर्षा कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा प्रमुख नीलम शिंदे, तालुका प्रमुख मधुरा तुळसकर, आशाताई वळपी, शहरप्रमुख भारती घारकर आणि सर्व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां यांनीही 'लाडक्या बहिणींचा' अपमान करणाऱ्या ठाकरे गटाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.तसेच ठाकरे गटाने काल उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी कुडाळ येथे उपस्थित होते ते अनेकजण जिल्ह्या बाहेरून आले होते. त्यामुळे तुमच्याकडे गर्दी कां होत नाही याचे आत्मपरीक्षण करा. असाही टोला निलम शिंदे यांनी खोबरेकर यांना लगावला.