For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आत्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न न करणारे लोक जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतात

06:13 AM Oct 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
आत्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न न करणारे  लोक जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतात
Advertisement

अध्याय नववा

Advertisement

भगवंत म्हणले आत्मज्ञानाचा दर्जा सर्व विद्यामध्ये श्रेष्ठ आहे. ते मिळाल्यावर पुनर्जन्म होत नाही. गुरुमुखातून ते ज्ञान अगदी थोड्या प्रमाणात उगवतांना दिसते पण ते हृदयातच नित्यसिद्ध असते. त्यावरील अज्ञानाचे कवच दूर झाले की, त्याची अनुभूती आपोआप येऊ लागते. प्रापंचिक सुख मिळवण्यासाठी माणसाला जेव्हढे कष्ट करावे लागतात त्यामानाने आत्मज्ञान कमी कष्टात मिळते. श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात प्रपंच यशस्वी व्हावा म्हणून तुम्ही जेव्हढे राबता त्याच्या निम्म्याने जरी प्रयत्न केलात तरी स्वरूपज्ञान किंवा आत्मज्ञान मिळेल. ह्यावरून मनुष्य त्याच्या संसारासाठी किती मोठ्या प्रमाणात राबत असतो हे लक्षात येते. तसेच कितीही राबले तरी आता पुरे असे त्याला वाटत नाही. ह्याउलट आत्मज्ञान एकदा प्राप्त झाले की, त्यामुळे मिळणारे समाधान कायम टिकून रहात असल्याने आता अधिक काही नको अशी खात्री पटून, रागलोभ इत्यादि विकार नाहीसे होतात आणि मनुष्य स्वस्थचित्त होतो. हे ज्ञान मिळवण्यासाठी अनेक जन्मांचा दीर्घ कालावधी खर्ची पडतो कारण माणसावर असलेला विषयसुखाचा पगडा नाहीसा होण्यालाच पुष्कळ कालावधी लागतो. असे असले तरी आत्मज्ञान मिळवण्यात खर्ची घातलेला कालावधी सुखदायक असल्याने त्याचा दीर्घपणा जाणवत नाही. याचे आणखीही एक महात्म्य म्हणजे हे प्राप्त झाले असता कधी हातातून जात नाही. गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील बहात्तराव्या श्लोकात भगवंतांनी आत्मज्ञान प्राप्त झालेल्याची ब्राह्मिस्थिती असते आणि ती पावली की, तेथून मनुष्य पुन्हा चळत नाही असे सांगितले आहे. असं असलं तरी लोकांना आत्मज्ञानापेक्षा विषयातून जे सुख मिळते ते जास्त आकर्षक वाटते म्हणून लोक आत्मज्ञानाच्या वाटेला जात नाहीत.

माणसाच्या स्वभावातला रजोगुण नेहमीच प्रभावी असल्याने त्याला चैनीची, छानछोकीची उपजतच आवड असते आणि त्यातंच खरे सुख आहे असे तो मानतो त्यामुळे इतके महत्त्वाचे असलेले आत्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न तो करत नाही. त्याची काय अवस्था होते ते भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत. ते म्हणतात, हे शत्रुतापना, आत्मज्ञानरूपी धर्मावर श्रद्धा न ठेवणारी माणसे माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत नसल्याने मृत्यूची वाट धरतात. अर्थात जो स्वत:हून मृत्यूची वाट धरतो त्याचा पुनर्जन्म निश्चित असतो असे भगवंतांना म्हणायचे आहे.

Advertisement

लोक नास्तिक हा धर्म अश्रद्धेने न सेविती । मृत्यूची धरिती वाट संसारी मज सोडुनी ।। 3 ।। श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, आत्मज्ञानाचे महत्त्व न समजल्याने किंवा समजूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून विषयसुखाला श्रेष्ठ मानणाऱ्या लोकांची धर्मावर श्रद्धा नसते. हे नास्तिक लोक हलक्या विचारसरणीचे असून मर्ख़ आणि दुराचारी असतात. मी त्यांच्या हृदयात वास करून आहे हे ते लक्षातच घेत नाहीत त्यामुळे ते सर्वश्रेष्ठ अशा आत्मज्ञानापासून मिळणाऱ्या सुखाला म्हणजे आत्मसुखाला मुकतात.

क्रमश:

Advertisement
Tags :

.