For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रात्रीच्या रात्री गायब होतात लोक

06:18 AM Jun 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
रात्रीच्या रात्री गायब होतात लोक
Advertisement

तुमचा शेजारी, भाऊ किंवा पती रात्री तुमच्यासोबत बोलून झोपी गेला आणि सकाळी त्याचा कुठलाच सुगावा लागत नसेल तर. ना फोन, ना मेसेज. जपानमध्ये ही कल्पना नाही तर वास्तव आहे. येथे ‘जोहात्सु’ म्हणजेच ‘वाष्पीकरण’ नावाचा एक फेनॉमिना दशकांपासून चालत राहिला आहे.

Advertisement

हजारो लोक दरवर्षी जाणूनबुजून गायब होतात आणि पूर्णपणे नवे जीवन सुरू करतात. जपानमध्ये ‘जोहात्सु’ अशा लोकांना म्हटले जाते, जे जाणूनबुजून गायब होतात. हे लोक पोलिसांना मिसिग पर्सनच्या रुपात रिपोर्ट करत नाहीत, कारण ते स्वेच्छेने गायब होतात. 1990 च्या दशकात जपानच्या आर्थिक संकटानंतर हा प्रकार आणखी वाढला. कर्ज, नोकरीचा दबाव, कौटुंबिय जबाबदाऱ्या अपयशी विवाह किंवा सामाजिक फजिती टाळण्यासाठी लोक हा मार्ग निवडतात. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे जपानमध्ये खास ‘नाइट मूव्हिंग’ कंपन्या आहेत, ज्या लोकांना गायब होण्यात मदत करतात. या एजेन्सी रात्रीच्या काळोखात सामान शिफ्ट करतात आणि नव्या ठिकाणी नवे घर शोधतात आणि कधीकधी नवी ओळख निर्माण करण्यातही सहाय्य करतात.

कसे काम करतात एजेन्सी?

Advertisement

ज्या व्यक्तीला गायब व्हायचे आहे, तो एजेन्सीशी संपर्क साधतो. एजेन्सी रात्रीच्या वेळी गुपचूपपणे त्याचे सामान पॅक करून घेऊन जाते. त्याला नव्या शहरात छोटे अपार्टमेंट शोधून देते. जुना पत्ता आणि संपर्क क्रमांकासोबतचा संबंध तोडण्यास मदत करते. अनेकदा नवा फोन नंबर आणि बँक अकौंटही सुचविते. या कंपन्या पूर्णपणे गोपनीयता बाळगतात. कुठलाही गुन्हा घडत नाही तोवर पोलीस याप्रकरणी काहीच करू शकत नाहीत.

परिवाराची स्थिती

ज्यामागे परिवार असतो, त्याचे जीवन सर्वाधिक प्रभावित होते. आईवडिल, पत्नी आणि मुले कित्येक वर्षांपर्यंत प्रतीक्षा करत राहतात. स्वकीय जिवंत आहे की नाही हे देखील त्यांना ठाऊक नसते. अनेक परिवार स्वत:चा शोध घेतात, परंतु जपानच्या कायद्यानुसार प्रौढ व्यक्ती जर स्वेच्छेने कुठे गेली असेल तर पोलीस त्याचे लोकेशन जाहीर करत नाहीत.

दरवर्षी जपानमध्ये हजारो लोक गायब होतात, यामागील मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत....

मोठे कर्ज अन् दिवाळखोरी

कामाचा अत्याधिक दबाव

कौटुंबिक कलह किंवा विवाहविषयक समस्या

सामाजिक अपमानाचे भय

मानसिक आरोग्याच्या समस्या

1990 चा आर्थिक फुगा फुटल्यावर ही संख्या अत्यंत वाढली होती. आजही युवा आणि मध्यम वयोगटातील लोक या मार्गाला निवडत आहेत.

Advertisement
Tags :

.