माध्यमांवर माणसांचीच पकड हवी
प्रतिनिधी/ बेळगाव
कोणतेही माध्यम मरत नाही, ते नवनवीन स्वरुप घेऊन पुन: पुन्हा समोर येत राहते. आज माध्यमांनी आपली जीवनशैली बदलली असून आपले अवघे जीवन ढवळून काढले आहे. आपल्या चित्तवृत्तींचा, आनंदाचा कब्जा माध्यमांनी घेतला आहे. परंतु, माध्यमांचे आव्हान मोडून काढत माणसांचीच माध्यमांवर पकड असावी, असे मत लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते श्रीरंग गोडबोले यांनी व्यक्त केले.
वसंत व्याख्यानमालेतर्फे आयोजित पहिले पुष्प गुंफताना ‘माध्यमे आणि प्रेक्षक’ या विषयावर ते बोलत होते. हेरवाडकर शाळेच्या सभागृहात या व्याख्यानमालेला प्रारंभ झाला. आपल्या व्याख्यानात गोडबोले यांनी दवंडी पिटण्याचा काळ येथपासून आजच्या एआयपर्यंतच्या माध्यमांचा धांडोळा घेतला.
ते म्हणाले, दवंडी पिटणे हे माध्यम आपण पाहत आलो आहोत. लोककला, मुद्राभिनय, नृत्य, नाट्या, संगीत, यक्षगान, भारुड, कीर्तन, गवळण, पोवाडा ही सर्व माध्यमे छोट्या समुहाची होती. जेव्हा या कलांना मूर्त स्वरुप आले, तेव्हा त्या एका चौकटीमध्ये आल्या. विष्णुदास भावे यांनी 1843 मध्ये पहिले मराठी नाटक लिहिले आणि त्यानंतर संगीत नाटकांची परंपरा सुरू झाली. 1913 मध्ये चित्रपट आला. नाटकांना उतरती कळा येऊन प्रेक्षक विभागला गेला. टॉकीज सुरू झाल्यानंतर नाटकांचा विसर पडला.
1920 च्या सुमारास रेडिओ अस्तित्वात आला. रवीकिरण मंडळाचे कवितांचे जाहीर कार्यक्रम सुरू झाले. वृत्तपत्रे मोठ्या प्रमाणात सुरू झाली. त्यांनी स्वातंत्र्यकाळात मोठी कामगिरी बजावली. स्वातंत्र्यानंतर देशात मोठे बदल होतील, हा भ्रम ठरल्याने विद्रोही साहित्य मोठ्या प्रमाणात आले. तोपर्यंत वाचन संस्कृतीवर टीव्हीने प्रहार केला. 1990 ला टेलिफोन संस्कृती उदयाला आली. पुढे रेडिओ आणि त्यानंतर खासगी वाहिन्यांवर माध्यमांची मोठी गर्दी झाली.
‘श्वास’ चित्रपटाने एक वेगळे वळण लावले. ‘सैराट’पासून ‘कट्यार’पर्यंत अभूतपूर्व यश मिळविले. पेशवेकाळात लावणीला ऊर्जितावस्था मिळाली, पण नंतर ती लयाला गेली. आता पुन्हा लावणी अस्तित्वात आली. याचाच अर्थ कोणतेही माध्यम मरत नाही. या माध्यमांनी आपली जीवनशैली मात्र बदलली. टीव्हीने वेळापत्रक आखून दिले होते. पण ओटीटीने तेसुद्धा बदलले.
आज तरुण पिढी 16 तासांहून अधिक काळ स्क्रीनवर असते. रिल्सच्या युट्यूबच्या आणि
पॉर्नच्या दुष्टचक्रात ती अडकली आहे. त्यामुळे आज माध्यम मनोरंजनाकडून आव्हानाकडे वळले आहे. आपल्या पिढीने हे सर्व पाहिले आहे. जेव्हा माणूस भुकेला असतो आणि त्याची एक गरज भागते, तोवर तो शांत असतो. पण त्याच्या गरजा तंत्रज्ञानाने वाढवल्या आणि त्याने माणसाचा कब्जा घेतला. परंतु, माध्यमांवर माणसांचीच पकड हवी, असे ते म्हणाले.
प्रारंभी दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अर्चना संगीत विद्यालयाच्या सदस्यांनी स्वागत व ईशस्तवन सादर केले. सुनीता देशपांडे यांनी स्वागत केले. स्वरुपा इनामदार यांनी प्रास्ताविक केले. नमिता कुरुंदवाड यांनी सूत्रसंचालन केले. हे व्याख्यान विनायक लेले यांनी त्यांच्या मातोश्री कै. आनंदीबाई लेले यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत केले होते. या व्याख्यानाला धनश्री नाईक यांचे सहकार्य लाभले. याबद्दल अनुराधा लेले तसेच स्वरुपा इनामदार यांचा सत्कार करण्यात आला. प्रियांका केळकर यांनी आभार मानले.