लोकांनी स्वदेशी उत्पादने खरेदी करावी!
कॅनडाच्या पंतप्रधानांचे जनतेला आवाहन : ट्रम्प यांच्याकडून 100 टक्के शुल्काची धमकी
वृत्तसंस्था/ ओटावा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 100 टक्के आयातशुल्काची धमकी दिल्यावर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी देशवासीयांना स्वदेशी सामग्री खरेदीचे आवाहन केले आहे. कार्नी यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत कॅनडाच्या अर्थव्यवस्थेवर बर्हिगत धोका असल्याने आमच्या नियंत्रणात जे आहे त्यावर लक्ष द्यावे लागेल असे म्हटले आहे. ट्रम्प यांनी कॅनडाला चीनसोबत व्यापार करार करण्यावरून कठोर धमकी दिली आहे. कॅनडाने चीनसोबत व्यापारी संबंध वाढविल्यास कॅनडाच्या उत्पादनांवर 100 टक्के आयातशुल्क लादणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांना संबोधिले गव्हर्नर
ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर पोस्ट करत कॅनडाच्या पंतप्रधानांना ‘गव्हर्नर कार्नी’ असे संबोधिले आहे. कार्नी कॅनडाला चीनसाठी अमेरिकेत सामग्री पाठविण्याचा ‘ड्रॉप ऑफ पोर्ट’ करू इच्छित असतील तर ही गैरसमजूत ठरेल. चीन कॅनडाचा व्यापार, सामाजिक संरचना आणि जीवनशैलीला पूर्णपणे नष्ट करेल असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. यापूर्वी शुक्रवारी ट्रम्प यांनी चीन कॅनडाला एका वर्षाच आत गिळून टाकेल असे वक्तव्य केले होते. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी हे ट्रम्प यांच्या ‘गोल्डन डोम’ क्षेपणास्त्र प्रकल्पाला विरोध करत असल्याने ट्रम्प नाराज झाले आहेत.
परस्परांचे सर्वात मोठे व्यापारी भागीदार
अमेरिका आणि कॅनडा हे परस्परांचे सर्वात मोठे व्यापारी भागीदार आहेत. अमेरिकेच्या सरकारी व्यापार संघटनेनुसार दोन्ही देशांदरम्यान दरदिनी सरासरी 2 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक रकमेचा व्यापार होतो. अमेरिकेला प्राप्त होणारे कच्चे तेल, गॅस आणि विजेचा मोठा हिस्सा कॅनडातून येतो. याचबरोबर ऑटो पार्ट्स, लाकूड आणि कृषी उत्पादने देखील अमेरिकेत कॅनडामधून मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात. कॅनडा स्वत:च्या एकूण निर्यातीचा मोठा हिस्सा अमेरिकेला पाठवितो. यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, औषधे आणि ग्राहकोपयोगी सामग्रीप्रकरणी कॅनडा अमेरिकेवर मोठ्या प्रमाणात निर्भर आहे.
मुक्त व्यापार करार
अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील दृढ व्यापारी संबंधांचा पाया 1989 मध्ये रचला गेला होता, तेव्हा पहिला मुक्त व्यापार करार झाला होता, 1994 मध्ये नाफ्ता लागू झाल्यावर हे संबंध आणखी दृढ झाले. यामुळे ऑटो, कृषी आणि निर्मित उत्पादनांची पुरवठासाखळी अमेरिका-कॅनडा सीमेच्या आर-पार जोडली गेली. 2020 मध्ये नाफ्ताच्या जागी युएसएमसीए लागू करण्यात आला. या कराराच्या अंतर्गत बहुतांश उत्पादने विनाशुल्क आयात-निर्यात होतात आणि व्यापाराला अधिक नियमबद्ध करण्यात आले. अमेरिका आणि कॅनडातील अनेक प्रकल्प एकाच उत्पादनावर एकत्रितपणे काम करतात.
कॅनडा अन् चीनमधील करारामुळे नाराज
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी 13-17 जानेवारी या कालावधीत चीनचा दौरा करत तेथे व्यापार करारावर स्वाक्षरी केली होती. चीनसोबतच्या कॅनडाच्या करारामुळे ट्रम्प नाराज असल्याचे समजते. सुमारे एक वर्षापूर्वी कार्नी यांनी चीनला कॅनडासाठी ‘सर्वात मोठा सुरक्षा धोका’ ठरविले होते, परंतु आता एक वर्षानंतर स्थिती बदलली आहे. चीन दौऱ्यात केलेल्या करारांमुळे कॅनडा चीनच्या इलेक्ट्रिक वाहनांवरील आयातशुल्क कमी करणार आहे. याच्या बदल्यात चीनने कॅनडाच्या काही महत्त्वपूर्ण कृषी उत्पादनांवरील आयातशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाषणामुळे संतापात भर
कॅनडाच्या पंतप्रधानांनी वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये ‘नव्या जागतिक व्यवस्थे’वर भाषण केले होते. याला दीर्घकाळात कुठल्याही राजकीय नेत्याने केलेल्या सर्वश्रेष्ठ भाषणांपैकी एक ठरविले जात आहे. कार्नी यांनी अमेरिकेचा दबदबा असलेली जागतिक व्यवस्था आता संपुष्टात आली असल्याचे नमूद पेले होते. यामुळे ट्रम्प यांच्या संतापात आणखी भर पडली असल्याचे मानले जाते.