For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जनतेने विश्वास ठेवून दिल्लीत नेतृत्व करण्याची संधी द्यावी

10:29 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
जनतेने विश्वास ठेवून दिल्लीत नेतृत्व करण्याची संधी द्यावी
Advertisement

गर्लगुंजी येथील प्रचारसभेत काँग्रेस उमेदवार अंजली निंबाळकर यांनी साधला महिला मतदारांशी संवाद

Advertisement

खानापूर : आजपर्यंत काँग्रेसने सर्वसामान्यांचा आणि गोरगरिबांच्या उन्नतीसाठी विविध योजना राबविलेल्या आहेत. मात्र भाजपचे हुकुमशाही सरकार आल्यानंतर फक्त भांडवलदारांचीच पाठराखण केली जात आहे. त्यामुळे गरीब जनता भरडली जात असून देश हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे. देश आणि लोकशाही टिकवायची असल्यास काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणे गरजेचे आहे. यासाठी तालुक्यातील जनतेने मला खासदार म्हणून निवडून द्यावे, असे आवाहन गर्लगुंजी येथील प्रचारसभेत बोलताना अंजली निंबाळकर यांनी व्यक्त केले. देशात भाजपचे सरकार सलग दहा वर्षे सत्तेत आहे. तर कारवार लोकसभा मतदारसंघाचे गेल्या तीस वर्षापासून भाजपचे खासदार नेतृत्व करत आहेत. मात्र या खासदारांनी तालुक्यात सुईच्या टोकाएवढा विकास केलेला नाही. हा वनवास संपवण्यासाठी खानापूर तालुक्याने योग्य विचार करून काँग्रेसला विजयी करणे गरजेचे आहे. काँग्रेसने निवडणुकीत वचन दिल्याप्रमाणे पाचही गॅरंटीची अंमलबजावणी अवघ्या महिन्याभरात केली आहे. जर देशात काँग्रेस आल्यास निश्चितच सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. मी आमदार असताना तालुक्याच्या विकासासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे. यात हॉस्टिपल, बसस्थानक, विविध शासकीय कार्यालय तसेच ग्रामीण आणि दुर्गम भागातील रस्त्यांसाठी कोट्यावधीचा निधी विरोधातील सरकार असतानासुद्धा मंजूर केलेला आहे. मात्र त्या कामांची पूर्तता करण्यात येत नसल्याचे पाहून खेद वाटत आहे. ही अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी तसेच तालुक्याच्या विकासासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे, असे निंबाळकर म्हणाल्या. यावेळी यशवंत बिरजे, वकील संघटनेचे अध्यक्ष आय. आर. घाडी, प्रसाद पाटील, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी, महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता दंडगल, जोतिबा गुरव, नगरसेवक तोईद चांदकन्नावर, प्रमोद सुतार, राजेश पाटील, रामचंद्र पाटील यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंजली निंबाळकर यांना खासदार करणे गरजेचे

Advertisement

यावेळी बोलताना ईश्वर घाडी म्हणाले, भाजपने बहुजन समाजातील युवकांची डोकी धर्माच्या नावाखाली भडकावणाचे काम केले आहे. त्यामुळे ते युवक आज एका विशिष्ट विचारधारेत गुरफटले आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढणे गरजेचे आहे. तसेच अंजली निंबाळकर यांना आम्ही एकदा आमदार केलेले आहे. आता काँग्रेसने तालुक्याला उमेदवारी दिली आहे. यासाठी त्यांना खासदार करणे हे आमचे कर्तव्य आहे.

अंजली निंबाळकर यांचा आज कित्तूर तालुक्यात प्रचार दौरा

कारवार लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार माजी आमदार अंजली निंबाळकर कित्तूर मतदारसंघातील ग्रामीण भागात शनिवार दि. 20 रोजी प्रचार दौरा करणार असून यात सकाळी 10 वाजता वन्नूर येथे गाठीभेटी आणि कोपरा सभा होणार आहेत. यानंतर 11 वाजता हणबरहट्टी येथे प्रचार, त्यानंतर दुपारी 12 वाजता देशनूर, 1 वाजता सुतगट्टी, 2 वा. नागनूर, 4 वा. संपगाव, 5 वा. हन्नीकेरी, 6 वा. चिक्कबागेवाडी, 7 वा. एम. के. हुबळी या ठिकाणी प्रचार सभा आणि मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात येणार आहेत. यावेळी कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, कित्तूर ब्लॉक अध्यक्ष संगनगौडा पाटील, चिकना मरडी, अश्पाक हवालदार, उमेशगौडा पाटील, मुदकाप्पा मरडी, यासह काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

Advertisement
Tags :

.