+923130624785 पाकिस्तानी नंबरपासून जनतेने सावध रहावे
पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग यांचे आवाहन
पणजी : पाकिस्तानी मोबाईल नंबरवरून अनेक सायबर गुन्हे होत असून राज्यातील अनेक लोकांची फसवणूक झाली आहे. 923130624785 हा पाकिस्तानी मोबाईल नंबर असून या नंबरपासून सावध रहावे, असे आवाहन पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग यांनी केले आहे. या नंबरवरून फोन आल्यास किंवा एसएमएस आल्यास त्याला प्रतिसाद देऊ नये किंवा एसएमएसला उत्तर देऊ नये, असेही डॉ. जसपाल सिंग यांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाचा दुऊपयोग होत असल्याचे दिसून येत आहे. धार्मिक विषयावरून चुकीची आणि वादग्रस्त ठरणारी माहिती व्हायरल करून धार्मिक तणाव निर्माण केला जात आहे. सोशल मीडियाचा वापर केवळ चांगल्या कामासाठीच करण्यात यावा. सोशल मीडियावर कुणाच्या धार्मिक भावना दुखावणारे किंवा श्रद्धेवर आघात करणारे पोस्ट टाकू नका, अशी सूचनावजा इशारा डॉ. जसपाल सिंग यांनी दिला आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून धार्मिक भावना भडकवण्याचे आणि दुखावण्याचे माध्यम म्हणून सोशल मीडियाचा वापर होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे लोकांची निदर्शने, मोर्चेही झाले आहेत. निदर्शकांनी महामार्गही रोखून धरला होता. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट आणि टिप्पण्या होत आहेत. श्रेया धारगळकर प्रकरणानंतर अनेक अशी प्रकरणे घडली आहेत. श्री लईराई देवीच्या होमकुंडाविषयीही असेच आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आले होते. नंतर म्हापसा येथे अशाच प्रकरणात एका युवकाला अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक डॉ. सिंग यांनी लोकांना सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करण्याचे आवाहन केले आहे.