For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

सर्वव्यापी असलेल्या भगवंतांना लोक मर्यादित करतात

06:24 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
सर्वव्यापी असलेल्या भगवंतांना  लोक मर्यादित करतात
Advertisement

अध्याय नववा

Advertisement

भगवंत अर्जुनाला म्हणाले मी निर्गुण, निराकार असून विश्वचालक आहे परंतु माझे हे स्वरूप न जाणता लोक मला मनुष्य रुपात पाहण्याचा मुर्खपणा करतात. ह्या अर्थाचा

मज मानव-रूपात तुच्छत्वे मूढ देखती । नेणूनि थोरले रूप जे माझे विश्व-चालक ।। 11 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. विवरणात माउली म्हणतात, मूर्ख लोक, त्यांच्या समजुतीप्रमाणे भगवंतांकडे पाहतात परंतु त्यांचे तसे पाहणेच त्यांच्या स्वरूपाचे खरे ज्ञान होण्यास प्रतिबंध करते. दिसतं तसं नसतं अशी एक म्हण आहे. नाशिवंत स्थूल आकार हेच माझे खरे स्वरूप आहे अशा निश्चयाने ते जर मला अविनाशाला पाहतात तर त्यांना मी कसा दिसेन? अर्जुना, पूर्वेच्या मार्गाला निघून कोणी पश्चिमेला पोहोचेल काय? अथवा अर्जुना कोंडा कांडून दाणे प्राप्त होतील काय? त्याप्रमाणे आकाराला आलेले हे शरीर, हेच मी, असे समजले तर माझे खरे स्वरूप जाणले जाईल काय? फेस प्याल्याने पाणी प्यायल्यासारखे होईल काय? मोहित झालेल्या मनोवृत्तीने हे स्थूल शरीरच मी परमात्मा आहे असे मानून देहाची जन्मादि कर्मे, ते माझ्यावर लादतात. नाव नसलेल्या मला नांव देतात. वस्तुत: मी क्रियाशून्य असून मी क्रिया करतो असे म्हणतात.

Advertisement

माउली आपल्याला भगवंतांचे मनोगत उलगडताना जे सांगतात त्यावरून लक्षात येते की, भगवंतांचे मूळ स्वरूप जाणून न घेता आपण त्यांना देहधारी समजतो आणि त्यांच्याबद्दल अनेक चुकीच्या कल्पना करून घेतो. त्याबद्दल सांगताना भगवंत म्हणतात, माझा आकार मी धारण केलेल्या देहाएव्हढाच आहे असे समजून लोक त्यांच्याप्रमाणे मला जन्म व मरण आहे असे मानतात. मला निराकाराला आकार देतात व देहरहित असलेल्या मला पूजेचे उपचार अर्पण करतात. शास्त्रमर्यादेचे बंधन नसलेल्या मला आचारादिक व्यवहार लावतात. जातींच्या पलीकडे असणाऱ्या मला एका विशिष्ट जातीचा समजतात, मला हात पाय नसतांना माझे ठिकाणी हातापायांची कल्पना करतात. मोजता न येण्याइतके माझे स्वरूप अमर्याद आहे. परंतु मलाही मर्यादेत घालतात. मी सर्व ठिकाणी असूनही मी अमुक ठिकाणापुरता मर्यादित आहे असे समजतात. ज्याप्रमाणे निजलेला मनुष्य स्वप्नात आपल्या अंथरुणावर अरण्य पाहतो, त्याप्रमाणे कान, नाक, डोळे ह्यांचा माझ्याशी काहीही संबंध नसताना माझ्या ठिकाणी त्यांची कल्पना करतात. कोणत्याही नात्याचा संबंध नसतांना माझ्या नातेवाईकांची कल्पना करतात. मी काळा, गोरा वगैरे नसतांनाही तसल्या रूपाची माझ्या ठिकाणी कल्पना करतात. मी अदृश्य असलो तरी मला दृश्य समजतात. मी इच्छारहित आहे तरी मला इच्छा आहे असे मानतात. मी वस्त्रात गुंडाळता येण्यासारखा नसून मला वस्त्र नेसवतात. शृंगाराच्या पलीकडे असतांना माझ्याकरता दागिन्यांची योजना करतात. सर्व जगाला मी उत्पन्न करणारा असून माझ्याही उत्पन्न होण्याची ते कल्पना करतात. नित्य असणाऱ्या माझी प्राणप्रतिष्ठा करतात. अर्जुना, सर्वांच्या आत्मतत्वाने अखंड दंडायमान असणाऱ्या मला आवाहन करतात आणि माझे विसर्जन करतात. ही किती आश्चर्याची गोष्ट आहे.

क्रमश:

Advertisement
Tags :

.