अमेरिकेत ट्रम्प-मस्क विरोधात लोक रस्यांवर
1200 रॅलींचे आयोजन : 150 हून अधिक समुहांचा सहभाग
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योजक इलॉन मस्क यांच्या धोरणाच्या विरोधात 1200 हून अधिक रॅली काढण्यात आल्या. शासकीय नोकऱ्यांमध्ये कपात, अर्थव्यवस्था आणि मानवाधिकार यासारख्या मुद्द्यांवर ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयांना विरोध करणे हा या रॅलींमागील उद्देश होता.
या निदर्शनांना ‘हँड्स ऑफ’ नाव देण्यात आले आहे. हँड्स ऑफ याचा अर्थ ‘आमच्या अधिकारांपासून दूर रहा’ असा घेतला जात आहे. या नाऱ्याद्वारे निदर्शक स्वत:च्या अधिकारांवर कुणाचे नियंत्रण नको असा संदेश ट्रम्प प्रशासनाला देऊ पाहत आहेत.
या निदर्शनांमध्ये 150 हून अधिक संघटनांनी भाग घेतला आहे. यात सिव्हिल राइट ऑर्गनायजेशन, कामगार संघटना, एलजीबीटीक्यू प्लस वॉलंटियर्स, माजी सैनिक आणि राजकीय कार्यकर्ते सामील होते. ही निदर्शने वॉशिंग्टन डीसीमध्ये नॅशनल मॉल, स्टेट कॅपिटल आणि सर्व 50 प्रांतांमध्ये झाली आहेत.
मस्क यांचा दावा
इलॉन मस्क हे अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनात डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएंसीचे प्रमुख आहेत. शासकीय व्यवस्थेचा आकार कमी केल्याने करदात्यांचे अब्जावधी डॉलर्स वाचणार असल्याचा मस्क यांचा दावा आहे. तर अध्यक्ष ट्रम्प हे सामाजिक सुरक्षा, आरोग्य योजनांसाठी पूर्णपणे प्रतिबद्ध आहे, परंतु डेमोक्रेट्स या योजनांचा लाभ अवैध स्थलांतरितांना मिळवून देऊ पाहत असल्याचे व्हाइट हाउसचे सांगणे आहे.
प्रत्युत्तरात्मक कराचे पाऊल
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी 2 एप्रिल रोजी अनके देशांवर प्रत्युत्तरात्मक कर लादण्याची घोषणा केली होती. यात भारतावर 26 टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा सामील आहे. भारतासोबत चीनवर 34 टक्के, युरोपीय महासंघावर 20 टक्के, दक्षिण कोरियावर 25 टक्के, जपानवर 24 टक्के, व्हिएतनामवर 46 टक्के आणि तैवानवर 32 टक्के आयातशुल्क लादण्यात आले आहे. अमेरिकेने जवळपास 60 देशांवर त्यांच्या आयातशुल्काच्या निम्मे आयातशुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे.