For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काकतीत श्री सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

10:11 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
काकतीत श्री सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी अलोट गर्दी
Advertisement

हजारो भाविकांच्या उपस्थितीत इंगळ्यांचा अभूतपूर्व सोहळा : सनई-चौघड्यांच्या निनादात पालखीचे आगमन

Advertisement

वार्ताहर /काकती

येथील जागृत ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानचा इंगळ्याचा सोहळा शुक्रवार दि. 12 एप्रिल रोजी हजारो भाविकांच्या साक्षीने सायंकाळी 6.10 वाजता अभूतपूर्व उत्साहात पार पडला. श्री सिद्धेश्वर हा भक्तांचा पाठीराखा आहे. या उत्कट भक्तीने श्री सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी अलोट जणसागर लोटला होता. गुरुवार दि. 11 रोजी सिद्धेश्वर मंदिरातून सायंकाळी सनई-चौघड्यांच्या  निनादात पालखी सोहळ्याचे आगमन किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या श्री रुद्रपाक देवस्थानात झाले. देवस्थानच्या हिरेमठ स्वामींच्या सानिध्यात हक्कदार, मानकरी, देवस्थान पंच आदींच्या उपस्थितीत देवाची विधिवत पूजा करून नैवेद्य दाखविण्यात आला. तेथून देवाची पालखी सवाद्य मिरवणुकीने सिद्धेश्वर देवस्थान अग्निकुंडाच्या पवित्र स्थळी आली. गाऱ्हाने घालून पालखी सोहळ्याचा मंदिरात प्रवेश झाला.

Advertisement

आंबिल गाड्याचा मान, औक्षण

सोमवारी सायंकाळी 6.30 च्या दरम्यान आंबिल गाड्यांची घरोघरी सुवासिनींकडून पंचारती करण्यात आली. देवस्थानचे हक्कदार, पुजारी सवाद्य मिरवणुकीने प्रथम सांगली सरकारचा मानाचा गाडा आणण्यासाठी हक्कदार चौगुले, सनदी यांच्या निवासस्थानातून निघाला. तर दोन क्रमांकाचा गाडा धुळप्पगौडा देसाई देशकतीचा, रामगौंडा देसाईच्या घरून निघाला. तीन क्रमांकाचा गाडा कुलकर्णीच्या मानाचा असलेला गवी हक्कदार घराण्याच्या घरातून निघाला. हे तिन्ही गाडे वतनदाराचे असून या गाड्यांना प्रथम मान देण्याची ऐतिहासिक परंपरा आहे. क्रमांक चार गवी, सोमाई, टुमरी, बडगुळी, कोचेरी असे हक्काचे गाडे थाटात सहभागी झाले होते. यासह गावातील गाडे आंबिल-घुगऱ्या घेऊन सहभागी झाले. सिद्धेश्वर मंदिराला सवाद्य प्रदक्षिणा घालून आंबिल-घुगऱ्याचा प्रसाद भाविकांना वाटण्यात आला.

शोभा गाड्याची मिरवणूक

गुरुवारी रात्री गाड्याचे पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. भावकाई गल्ली, होळी गल्ली, मारुती गल्ली, मुत्तेनट्टी आदी शोभा गाडे मिरवणुकीत सहभागी झाले होते. या प्रत्येक गल्लीच्या मंडळाने विविध कलाकुसरीने, आकर्षक विद्युत रोषणाईने गाडे सजविले होते. यंदा खास आकर्षण म्हणजे शोभा गाड्यांना व मिरवणुकीत दिमाखदार बैलजोडी होत्या. वाद्य वृंदाच्या ताफ्यात युवावर्ग गुलालाची उधळण करीत होता. रात्री उशिरा 12 नंतर शोभा गाड्यांची मिरवणूक सिद्धेश्वर मंदिर प्रांगणात पोहोचली होती. धार्मिक मुहूर्ताच्या विधीसह इंगळ्याची लाकडे प्रज्वलित करण्यात आली. शोभा गाड्यांनी मंदिराला प्रदक्षिणा घालून शुक्रवारी सकाळी 9 वाजता सांगता झाली.

मनोज्ञ दर्शन घडविणारा इंगळ्याचा सोहळा

शुक्रवारी सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास देवस्थाने प्रमुख हिरेमठ स्वामी यांचे मंदिरात सवाद्य आगमन झाले. मंदिराच्या दक्षिण प्रांगणात असलेल्या गदगेवर स्वामी विराजमान झाले. देवस्थान पंच, हक्कदार, मानकरी यांनी स्वामींची पाद्यपूजा करून आशीर्वाद घेतले. इंगळ्याच्या धार्मिक विधिवत सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देवस्थानचा नंदीकोळ, कणबर्गी सिद्धेश्वरचा नंदीकोळ, सांभाळ, धुपारती, दिवटी, घंटानाद, शंखनाद, हक्कदारी, मानकरी आदी यजमान, भाविकांनी मुहूर्ताच्या घटकेनुसार अग्निकुंडाला प्रदक्षिणा घातली. अग्निकुंडाचे पूजन व विधिवत घटकेनुसार अग्निकुंडाला प्रदक्षिणा होताच सहभागी भाविकांनी हर हर सिद्धेश्वराच्या जयघोषात पेटलेल्या इंगळ्यातून धूम ठोकली. श्री सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मंदिरात झुंबड लोटली होती. शुक्रवारी पहाटेपासून मंदिरात महाअभिषेकसह दिवसभर धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल होती. मागणी केलेल्या भाविकांनी दीड नमस्कार व तुलाभार देवाला अर्पण केले. रात्री मराठी नाटकाचा कार्यक्रम झाला.

आज जंगी कुस्त्यांचे मैदान

शनिवार दि. 13 रोजी कुस्ती मैदानाचे आयोजन अष्टगीर आमराईत सायंकाळी 4.30 वाजता होणार आहे. प्रसिद्ध पैलवानाच्या निकाली कुस्ती होणार आहेत. प्रथम क्रमांक नागराज बशीडोणी वि. उदय दिल्ली, दुसरा क्रमांक प्रकाश इंगळगी वि. अमर पाटील, तिसरा क्रमांक कीर्तीकुमार वि. सत्पाल नागटिळक, चौथा क्रमांक पार्थ पाटील वि. विजय बिचकुले अशा ठरवलेल्या 13 जोड कुस्त्यांची खडाजंगी आखाड्यात होणार आहे.

Advertisement
Tags :

.