काँग्रेसवर पक्षावर जनतेचा विश्वास नाही
आप स्वबळावर लढणार : आतिशी यांची माहिती
मडगाव : काँग्रेस पक्षावर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे ‘आम आदमी पार्टी’ गोव्यात आगामी जिल्हा पंचायत, नगरपालिका व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याची माहिती दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी मारलेना यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. नावेली येथे दक्षिण गोवा आम आदमी पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन आतिशी मारलेना यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आपचे आमदार व्रुझ सिल्वा व व्हेन्झी व्हियेगस तसेच प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गोव्यात गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे 11 आमदार निवडून आले होते. त्यातील 8 जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जनतेचा काँग्रेसवर विश्वास राहिलेला नाही. वारंवार असे प्रकार गोव्यात घडतात, काँग्रेसचे आमदार निवडून आल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करतात असे आतिशी म्हणाल्या. सर्व सामान्य जनतेला पर्याय हवा असून हा पर्याय केवळ आपच देऊ शकणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी सुरू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या विधानसभा निवडणुकीत व्रुझ सिल्वा व व्हेन्झी व्हियेगस हे आपचे दोन आमदार लोकांनी निवडून दिले. हे दोन्ही आमदार पक्षाशी प्रामाणिक असून दोन्ही आमदार आपआपल्या मतदारसंघात उल्लेखनीय कार्य करीत असल्याचा दावा त्यांनी केला.
राजकीय पंडिताचे भाकीत खोटे ठरविले
गोव्यात विधानसभा निडणूक झाल्यानंतर राजकीय पंडितांनी आपचे दोन आमदार पक्षांतर करणार असल्याचे भाकीत केले होते. पण, दोन्ही आमदारांनी हे भाकीत खोटे ठरविल्याचे आतिशी यांनी सांगितले. आपचे दोन्ही आमदार हे सत्ता व पैशांसाठी आलेले नाहीत तर ते लोकांची कामे करण्यासाठी आलेले आहेत व ते योग्यरित्या काम करीत आहे.
भाजपकडून लुटमार
गोव्यात भाजपचे मंत्री लुटमार करीत असल्याचा दावा भाजपचेच माजी मंत्री करतात आणि गोव्यात सुरू असलेल्या लुटमारीवर शिक्कामोर्तब करतात. एका माजी मंत्र्याला आपले काम करून घेण्यासाठी लाखो रूपये द्यावे लागतात तर सर्व सामान्य जनतेचे काय असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. आम आदमी पक्ष गोव्यातील जनते सोबत राहिला असून आता 2027च्या निवडणुकीची तयारी सुरू झाली असून लोक पुन्हा एकदा ‘आप’ला पसंती देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दिल्लीत आपच्या नेत्यांची छळवणूक
विधानसभा निवडणुकीला दोन-तीन वर्षे असतानाच दिल्लीत आपच्या नेत्यांची केंद्र सरकारने छळवणूक सुरू केली होती. पक्षाच्या मुख्य नेत्यांना अटक करण्यात आली. दीर्घकाळ त्यांना तुरूंगात ठेवण्यात आले. विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मशिनरीचा गैरवापर करण्यात आला. असे असतानाही ‘आप’ला 43 टक्के तर भाजपला 45 टक्के मते मिळाली. भाजपने सर्व यंत्रेणेचा वापर करून देखील दिल्लीत जनतेने आम आदमी पार्टीवर विश्वास ठेवला. या विश्वासला खरे उतरण्याची जबाबदारी आता ‘आप’च्या आमदारांची असून जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अरविंद केजरीवाल झालेय ध्यानस्त
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल लोकांना भेटत नाही. लोकांकडे संवाद साधत नाही असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केला असता आतिशी म्हणाल्या की, ते ध्यानस्त झाले असल्याने कुणाकडे संवाद साधत नाही किंवा भेटत नाहीत, असे म्हणत त्यांनी पत्रकार परिषद आवरती घेतली.