भाजप-निजद युती लोकांना पटलेली नाही
काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांचा कार्यकर्त्यांशी संवाद
कारवार : राज्यातील भाजप आणि निजद दरम्यान झालेली युती कारवार जिल्ह्यातील अनेकांना पटलेली नाही. त्याशिवाय कारवार लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारही अनेकांना आवडलेला नाही. परिणामी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे यावेळी निवडून येण्याची सुवर्णसंधी आम्हाला मिळणार आहे. काँग्रेसबद्दल आता निर्माण झालेले वातावरण मतदानाच्या दिवसापर्यंत टिकवून ठेवण्याचे आवाहन कारवार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले. गोकर्णचे जिल्हा पंचायत माजी सदस्य प्रदीप नायक देवरभावी यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना त्या पुढे म्हणाल्या, आपण स्त्राrरोग तज्ञ म्हणून दहा वर्षे सेवा बजावली आहे. त्यामुळे आपणाला महिलांच्या सुखदु:खाची चांगली जाणीव आहे. जनतेची सेवा करावी या उद्देशाने आपण राजकारणात प्रवेश केला आणि खानापूर मतदार संघातून विधानसभेवर निवडून आले. कारवार लोकसभा मतदार संघात अनेक समाजाचे लोक वास्तव्य करून आहेत. सर्व समाजबांधवांच्या सुखदु:खाची आपणाला जाणीव आहे, असे स्पष्ट करून निंबाळकर पुढे म्हणाल्या, गेल्या दहा वर्षात केंद्रातील भाजप सरकारने खोट्या आश्वासनांची खैरात केली आहे. तर राज्यातील काँग्रेस सरकारने गेल्या दहा महिन्यात गॅरंटीची पुर्तता केली आहे. गॅरंटी शिदोरीच्या जोरावर मतदारांकडे मतदानाची याचना करा, असे सांगितले. याप्रसंगी बोलताना प्रदीप नायक म्हणाले, सहावेळा या मतदार संघातून आलेल्या खासदारांनी एकदाही स्थानिक कार्यक्रमात हजेरी लावली नाही. कुणीतरी विद्यमान खासदारांनी स्थानिक कार्यक्रमात हजेरी लावल्यास आपण राजकारणातून निवृत्त होतो, असे पुढे नायक यांनी स्पष्ट केले. यावेळी केपीसीसी प्रधान कार्यदर्शी निवेदीत अल्वा, भुवन भागवत यांनी कार्यकर्त्यांना डॉ. निंबाळकर यांना निवडून आणण्याचे आवाहन केले.