जर लोक बदलाच्या मूडमध्ये असतील तर नक्कीच बदल घडवतील; चेहरा जाहीर न केल्याने काहीच फरक पडत नाही- शरद पवार
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर न केल्याने त्याचा इंडिया आघाडीवर कोणताही परिणाम होणार नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सुप्रिमो शरद पवार यांनी दिली आहे. तसेच जर देशातील लोक बदल घडवण्याच्या मानसिकतेमध्ये असतील तर नक्कीत बदल घडवून आणतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
काल पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांना भारताकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार नसल्याबद्दल विचारण्यात आले. यावर बोलताना पवार 1977 च्या सार्वत्रिक निवडणुकांचा संदर्भ देताना म्हणाले, "इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यासाठी चेहरा नसल्यामुळे आघाडीवर काहीच फरक पडणार नाही. आणिबाणीनंतर 1977 च्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्ष जेव्हा निवडणुकीला सामोरे गेला तेव्हा इंदिरा गांधींविरुद्ध जबरदस्त विजय मिळवला होता. तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावाचा उल्लेख निवडणुकीपूर्वी कुठेही नव्हता, अगदी नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले त्यावेळीही त्यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नव्हता." असे म्हटले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, "1977 च्या निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी कोणताही चेहरा समोर नसताना निडणुकीनंतर मोराराजी देसाई पंतप्रधानपदी निवडून आले. निवडणुकीपूर्वी देसाई यांचे नाव कुठेच नव्हते पण प्रत्यक्षात त्यानंतर नवा पक्ष अस्तित्वात आला आणि मतदानानंतर मोराराजी देसाई पंतप्रधान झाले. त्यामुळे पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर न केल्यास निवडणुकिवर कोणताही परिणाम होणार नाही. जर लोक बदलाच्या मूडमध्ये असतील तर ते नक्कीच बदल घडवून आणण्यासाठी कौल घेतील,” असा दावा शरद पवार केला.