संत्र्यांच्या साली विकून होत आहेत कोट्याधीश
10 वर्षे जुन्य सालींना मोठी मागणी
चीनमध्ये संत्र्यांच्या सालीचा व्यवसाय कोट्याधीश करणारा ठरला आहे. गुंगडॉन्ग प्रांताच्या जिन्हुई भागात संत्र्यांच्या सुकलेल्या सालींना चेनपी म्हटले जाते. या साली विकून लोक श्रीमंत होत आहेत. 10 वर्षे जुन्या सालींची किंमत 12 हजार रुपये प्रतिकिलो आहे. तर 50-60 वर्षे जुन्या साली लाखो रुपयांमध्ये विकल्या जातात. बाजारात याची मागणी इतकी मोठी आहे की लिस्ट होताच स्टॉक आउट-ऑफ-स्टॉक होतोय. हा काही नवा ट्रेंड नसून शतकांपेक्षा जुनी परंपरा आहे. आता याने गुंतवणुकीचे नवे रुप धारण केले आहे.
चेनपी म्हणजेच संत्री किवा मँडरिन ऑरेंजच्या सालींना उन्हात सुकवून एज केले जाते. हिरव्या संत्र्यांना निवडून साली काढल्या जातात. मग 3 दिवसांपासुन अनेक वर्षांपर्यंत त्यांना सुकविले जाते. साल जितकी जुनी, तितकीच गोड, कडू आणि सुगंधित स्वाद. पारंपरिक चिनी चिकित्सेत हे पचन सुधारणे, खोकला दूर करणे, फुफ्फुसांना साफ करणे आणि सर्दी-खोकल्यात रामबाण मानले जाते. यात नोबिलेटिन, हेस्पेरिडिन यासारखे घटक असतात, जे इम्युनिटी बूस्ट करतात. स्वयंपाक घरातही त्यांचा वापर होतो. चेनपी चिकन, चहा किंवा मसाल्यांमध्ये मिसळून ते खाल्ले जाते. परंतु आता याचा खरा बाजार औषध आणि गुंतवणुकीतच आहे.
जबरदस्त मागणी
जिन्हुईला ‘चेनपी कॅपिटल’ म्हटले जाते. येथे हजारो एकर संत्र्यांच्या बागा आहेत. प्रत्येक हिवाळ्यात साली सुकवतात, मग एजिंगसाठी स्टोर करतात. 1-3 वर्षांच्या साली स्वस्त (जवळपास 600-1000 रुपये किलो) विकल्या जातात, परंतु 10 वर्षे जुन्या सालींना 12 हजार रुपयांपर्यंत दर मिळतो. 30 वर्षांच्या सालींना 1 लाख रुपये किलो आणि 50 वर्षांपेक्षा अधिक जुन्या सालींना 8 लाख रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळतो. 2023 मध्ये हाँगकाँग ऑक्शनमध्ये 1968 चा चेनपी 75,000 हाँगकाँग डॉलर्समध्ये (सुमारे 8 लाख रुपये) विकला गेला होता.
अत्यंत खास साली
चीनमध्ये टीसीएमचा बाजार 2025 पर्यंत 500 अब्ज डॉलर्सचा झाला आहे. कोविडनंतर लोक हर्बल औषधांवर अधिक विश्वास ठेवत आहेत. चेनपी चहा, कॅप्सूल किंवा पावडरमध्ये वापरली जाते. याची निर्यातही वाढली आहे. आता अमेरिका, युरोपमध्ये ऑर्गेनिक फूड ट्रेंडमध्ये आहेत. परंतु खरी कमाई होर्डिंगने होते. गृहिणी घरात साली सुकवून स्टोअर करतात आणि 5-10 वर्षांनी विकतात. संत्री धुवून साली काढून उन्हात सुकविण्यात येतात. मग एअरटाइट जारमध्ये ठेवल्या जातात. 3 वर्षांनी त्या वापरण्यायोग्य ठरतात. तर 10 वर्षांनी त्यांचे मूल्य वाढते. परंतु यात काळजी बाळगणेही आवश्यक आहे. चांगल्या गुणवत्तेसाठी ऑर्गेनिक संत्री वापरण्यात येते. चीनमध्ये मशीन्समुळे उत्पादन वाढले आहे, परंतु हँडमेड सर्वात महाग विकले जातात. आता भारतातही याचा बाजार वाढत आहे.