पेंडूरचा त्रैवार्षिक मांड उत्सव 10 जानेवारीला
14 दिवस चालणारा महाराष्ट्रातील एकमेव उत्सव
कट्टा / वार्ताहर
ऐतिहासिक परंपरा लाभलेला सिंधुदुर्ग मालवण तालुक्यातील पेंडूर गावचा 14 दिवस भरविला जाणारा देवीचा मांड उत्सव यावर्षी दिनांक 10 जानेवारी 2025 ते 23 जानेवारी 2025 या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्ट पेंडूर यांनी दिली. सुमारे 300 वर्षांची परंपरा लाभलेला मांड उत्सव म्हणजे पेंडूर गावचे ग्रामदैवत श्री देव वेताळाची बहीण देवी जुगाई असून दर एक वर्षाआड स्वतः श्री देव वेताळ हा आपल्या बहिणीला १४ दिवसांसाठी माहेर पणाला घेऊन येतो. श्री देवी जुगाई १४ दिवस माहेरी राहते आणि तिच्या या माहेरपणाचा काळ म्हणजेच मांड उत्सव होय. जसा बारा वर्षांनी कुंभमेळा मोठया गर्दीत उत्साहाने साजरा होतो अगदी त्याप्रमाणे सिंधुदुर्ग मालवण तालुक्यात पेंडूर गावात श्री देव वेताळ, श्री देवी सातेरी आणि श्री देवी जुगाई च्या कृपेने तब्बल 14 दिवसांचा कुंभमेळा भरतो. या वर्षी मांड उत्सवाची तारीख निश्चित करण्यासाठी पेंडूर गावातील बारा पाच मानकरी, गावकर मंडळी , देवस्थान ट्रस्ट कमिटी सर्व सदस्य, गावातील ग्रामस्थ या सर्वांनी मंदिरात एकत्र येऊन बैठक घेतली व देवाला सांगणे करून देवाच्या परवानगीने 10 जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. यावर्षीचा मांड उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येणार आहे तसे नियोजनही सुरू आहे 14 दिवसांच्या कालावधीत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत अशी माहिती देण्यात आली. तरी राज्यात आणि राज्याबाहेरही प्रसिद्ध असलेल्या मांड उत्सवास जास्तीत जास्त भाविकांनी भेट देऊन श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती देवस्थान विश्वस्त मंडळा मार्फत करण्यात आली आहे.