जिल्हा बँकेच्या चार जागांचा प्रलंबित निकाल जाहीर
निपाणीतून आण्णासाहेब जोल्ले तर हुक्केरीतून रमेश कत्ती विजयी
बेळगाव : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत चार जागांचा निकाल राखून ठेवण्यात आला होता. रविवार दि. 2 नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाने आदेश दिल्याने उर्वरित चार जागांचा निकाल जाहीर करण्यात आला. निपाणी आण्णासाहेब जोल्ले, बैलहोंगल महांतेश दोड्डगौडर, कित्तूर नानासाहेब पाटील तर हुक्केरी तालुक्यातून रमेश कत्ती विजयी झाल्याची माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक अधिकारी श्रवण नायक यांनी दिली.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 19 ऑक्टोबरला चुरशीने मतदान झाले होते. न्यायालयीन प्रक्रियेमुळे 7 जागांपैकी 3 जागांचे निकाल जाहीर करण्यात आले होते. तर चार जागांचे निकाल राखून ठेवण्यात आले होते. मात्र उच्च न्यायालयात पीकेपीएस संबंधित खटले प्रलंबित असल्याने 7 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत तीन जागांचा निकाल जाहीर करण्यात आला होता. तर चार जागांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. त्यावेळी अथणी, रायबाग व रामदुर्ग मतदारसंघांचा निकाल जाहीर करण्यात आला होता. मात्र निपाणी, हुक्केरी, कित्तूर व बैलहोंगल मतदारसंघांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता.
रविवार दि. 2 नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाने प्रलंबित 4 मतदारसंघांचा निकाल जाहीर करण्याचा आदेश निवडणूक अधिकाऱ्यांना दिला होता. त्यानुसार निवडणूक अधिकारी श्रवण नायक यांनी रविवारी दुपारी बँकेच्या सभागृहात निकाला जाहीर केला. निपाणी मतदारसंघातून 119 मतदानापैकी आण्णासाहेब जोल्ले यांनी 71 मते घेऊन विजय मिळविला. तर उत्तम पाटील यांना 48 मते मिळाली. हुक्केरी मतदारसंघातून 91 मतदानापैकी रमेश कत्ती यांनी 59 मते मिळवून विजयी पताका फडकाविला. तर राजेंद्र पाटील यांना 32 मते मिळाली. बैलहोंगल मतदारसंघातून महांतेश दोड्डगौडर यांनी 75 मतदानापैकी 54 मते मिळवून विजय मिळविला असून विश्वनाथ पाटील यांना 21 मते मिळाली. कित्तूर मतदारसंघातून नानासाहेब पाटील यांनी 32 मतदानापैकी 17 मते मिळवून विजय मिळविला तर विक्रम इनामदार यांना 15 मते मिळाली. विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
डीसीसी बँकेच्या निवडणुकीत जारकीहोळी गटाचे पूर्णपणे वर्चस्व राहिले आहे. यापूर्वी 9 जागा बिनविरोध निवड झाल्या होत्या. 19 ऑक्टोबरला डीसीसी बँकेची निवडणूक झाली होती. न्यायालयीन प्रक्रियेमुळे 3 जागा जाहीर झाल्या होत्या. तर 4 जागा राखून ठेवल्या होत्या. आता चार जागांचा निकालही जाहीर झाल्या आहेत. एकंदरीत डीसीसी बँकेच्या निवडणुकीत जारकीहोळी गटाचेच वर्चस्व राहिले आहे. बिनविरोध निवड झालेल्यांपैकी 7 जागा जारकीहोळी गटाच्या असून, 2 उमेदवारांनी अद्याप पाठिंबा दर्शविलेला नाही. आता 4 जागांपैकी 3 जागा या जारकीहोळी व जोल्ले गटाच्या असून, निवडणुकीत या गटाने एकहाती बाजी मारली आहे.
संपूर्ण जिल्ह्याचे हुक्केरी तालुक्याकडे लक्ष लागून राहिले होते. हुक्केरी तालुका वीज संघाच्या निवडणुकीत रमेश कत्ती गट व जारकीहोळी-जोल्ले गटाने जोर लावला होता. मात्र या निवडणुकीत कत्ती गटाने एकहाती सत्ता मिळवत त्यांच्या सर्व जागा विजयी झाल्या होत्या. यामुळे डीसीसी बँकेच्या निवडणुकीत सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. यासाठी दोन्ही गटाकडून प्रतिष्ठा पणाला लावण्यात आले होते. या निवडणुकीतही रमेश कत्ती यांनी बाजी मारली. निपाणी तालुक्याच्या निवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष होते. उत्तम पाटील यांनी आण्णासाहेब जोल्ले यांच्या विरोधात उमेदवारी केल्याने चुरस निर्माण झाली होती. दोन्ही उमेदवारांनी पूर्ण शक्तीने निवडणुकीला सामोरे गेले. मात्र, आण्णासाहेब जोल्ले यांनी बाजी मारत विजयी पताका फडकाविली.
यापूर्वीच 9 जागा बिनविरोध
यापूर्वीच 9 जागा बिनविरोध झाल्या आहेत. चिकोडी-गणेश हुक्केरी, कागवाड-राजू कागे, सौंदत्ती-विरुपाक्ष मामणी, गोकाक-अमरनाथ जारकीहोळी, बेळगाव-राहुल जारकीहोळी, खानापूर-अरविंद पाटील, यरगट्टी-विश्वास वैद्य, मुडलगी- निलकंठ कप्पालगुद्दी तर इतर सहकारी संस्था गटातून चन्नराज हट्टीहोळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. 19 ऑक्टोबरला झालेल्या निवडणुकीत अथणी - लक्ष्मण सवदी, रायबाग- आप्पासाहेब कुलगुडे, रामदुर्ग- मल्लाप्पा यादवाड यांचा निकाल जाहीर करण्यात आला होता. रविवार 2 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालात निपाणी- आण्णासाहेब जोल्ले, हुक्केरी- रमेश कत्ती, बैलहोंगल- महांतेश दोड्डगौडर, कित्तुर- नानासाहेब पाटील हे विजयी झाले आहेत.
अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी 10 नोव्हेंबरला मतदान
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निकाल पूर्णपणे जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीकडे लागल्या होत्या. दरम्यान सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्तांच्या आदेशानुसार सोमवार दि. 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे. याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आपले नामांकनपत्र बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून देणे बंधनकारक आहे. वेळापत्रकानुसार निर्धारित वेळेत निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष सादर करणे अनिवार्य आहे. नामांकन फॉर्मवर स्वाक्षरी करून नियामक मंडळाच्या किमान एका सदस्यांने नामांकनाचे समर्थन करणे गरजेचे आहे. नामांकन भरणाऱ्या उमेदवाराने स्वत: उपस्थित राहून निवडणूक अधिकाऱ्यांना माघार घेण्याची प्रक्रिया करणे आवश्यक आहे. कोणत्या पदासाठी नामांकन भरत आहोत हे स्पष्टपणे नमूद करणे उमेदवारांसाठी बंधनकारक आहे.
सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. दुपारी 3 वाजता अर्जांची छाननी करण्यात येणार असून, अर्जांच्या पडताळणीनंतर उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. यादी प्रसिद्ध केल्यानंतर 30 मिनिटांच्या आत उमेदवारीअर्ज माघारी घ्यावा लागणार आहे. अर्ज माघारी नंतर माघार घेतलेल्या उमेदवारांचे व निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर मतदानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदानानंतरच्या काही वेळानंतर लागलीच मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.