‘एचएसआरपी’ नसल्यास दंड आकारणार
परिवहन खात्याचा इशारा : एचएसआरपी नंबर प्लेट्स बसविण्यासाठी 31 मे ची डेडलाईन
बेंगळूर : वाहनांच्या जुन्या नंबरप्लेट्स बदलून हाय सिक्मयुरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसवविण्यासाठी 31 मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर परिवहन विभाग एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनधारकांकडून दंड आकारण्याच्या तयारीत आहे. एचएसआरपी नंबरप्लेटबाबत परिवहन खात्याने यापूर्वी दिलेली मुदत वाढवून देण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात होती. काही जुन्या वाहन कंपन्यांचे शोरुम उपलब्ध नसणे, वेबपोर्टल सर्व्हरची समस्या आणि प्री-बुकिंगचे स्लॉट निश्चित नसल्यामुळे वेळेवर नंबरप्लेट मिळत नसल्याची तक्रार वाहनधारकांनी केली होती. त्यामुळे एचएसआरपी बसविण्यासाठी 31 मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मुदतवाढ देऊनही अनेक वाहनधारक एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे 31 मे नंतरही एचएसआरपी प्लेट न लावणाऱ्या वाहनधारकांकडून दंड आकारण्याचा निर्णय परिवहन खात्याने घेतला आहे. प्रथम उल्लंघन करणाऱ्यांसाठी 500 ऊपये दंड आकारला जाणार असून त्यानंतर प्रत्येकवेळी 1,000 रुपये दंड आकारण्याचा विचार करत असल्याचे परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय परिवहन खात्याच्या आदेशानुसार, 1 एप्रिल 2019 पूर्वी खरेदी केलेल्या/नोंदणी केलेल्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट अनिवार्यपणे बसविण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांची संख्या सुमारे 2 कोटी असून जुनी नंबरप्लेट बदलण्यासाठी सुऊवातीला 17 नोव्हेंबर 2023 पर्यंत परवानगी देण्यात आली होती. मात्र, अनेक वाहनधारकांनी माहितीअभावी आणि गोंधळामुळे योग्य प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे 17 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदत वाढवण्यात आली. त्यानंतरही तिसऱ्यांदा 31 मेपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे 31 मे पूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट्स न बसविल्यास वाहनधारकाला दंड भरावा लागणार आहे.