हेल्मेट नाही म्हणून दंड
हेल्मेट घातले नाही, म्हणून दंड करण्यात आला, यात विशेष ते काय, असा प्रश्न आपल्याला पडण्याची शक्यता आहे. कारण अनेक राज्यांमध्ये दुचाकीस्वारांना हेल्मेटचा उपयोग करणे अनिवार्य करण्यात आलेले असते. अशा स्थितीत कोणी बाईक किंवा कोणतेही स्वयंचलित दुचाकी वाहन हेल्मेट न घालता चालवत असेल तर त्याला वाहतूक पोलिस थांबवतात आणि दंडाची पावती फाडतात, हे दृष्य आपण नेहमी पाहिलेले असते. मात्र, बिहारमधील गोपालगंज शहरात हेल्मेट घातले नाही, म्हणून वाहतूक पोलिसाने 1 हजार रुपये दंड वसूल केल्याची घटना सध्या विशेषत्वाने गाजत आहे. याचे कारण तितकेच विशेष आणि आवाक् करणारे आहे.
या शहरात काही महिन्यांपूर्वी एका वाहनचालकाच्या मोबाईलवर त्याला विनाहेल्मेट वाहन चालविल्याप्रकरणी 1 हजार रुपये दंड करण्यात आला आहे, असा संदेश आला. मुरारी कृष्ण तिवारी असे या चालकाचे नाव आहे. दंडाचा संदेश आल्यानंतर त्याला आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्याने कोठेही बाईकवरुन प्रवास केलेला नव्हता. दंडाच्या संदेशातील माहिती त्याने पुन्हा वाचली तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण बाईक नव्हे, तर कार चालविताना हेल्मेट न घातल्यामुळे त्याला हा दंड करण्यात आला होता. संदेशात त्याच्या कारचा क्रमांकही बीआर 28 वाय 9224 हा देण्यात आला होता. यासंबंधात त्यांनी त्वरीत वाहतूक विभागाकडे तक्रार केली. तेव्हा घोटाळा लक्षात आला.
त्याच्या कारच्या क्रमांकाशी साधर्म्य असणाऱ्या एका बाईकस्वाराला हा दंड करण्यात आला होता. या बाईकचा क्रमांक बीआर 28 वाय 9242 असा होता. तिवारी यांच्या कारचा शेवटचा क्रमांक 9224 असा होता. 24 आणि 42 यामध्ये घोटाळा झाला होता आणि कारचालकाला हेल्मेट न घालता कार चालविल्यामुळे दंडाचे चलन मोबाईलवर पाठविण्यात आले होते. पुढची विशेष बाब म्हणजे वाहतूक अधिकाऱ्याने तिवारी यांना दंड भरण्याचे कारण नाही असे स्पष्ट केले. तसेच काही दिवसात चलन रद्द केले जाईल, असे आश्वासनही दिले. मात्र, सहा महिने झाले तरी चलन रद्द झाले नाही. त्यामुळे तिवारी यांना त्यांच्या कारसाठीचे प्रदूषण प्रमाणपत्र मिळत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ते आपली कार प्रवासासाठी उपयोगात आणू शकत नाहीत. अद्यापही अशीच स्थिती असून चलन अद्यापही रद्द झालेले नाही, त्यामुळे ते वैतागले आहेत.