भारतीय संघासमोर पेनल्टी कॉर्नरची समस्या
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारतीय महिला हॉकी संघासाठी सध्या येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाच्या (साई) केंद्रामध्ये पाच दिवसांचे सराव शिबिर सुरू आहे. गेल्या काही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय महिला हॉकीपटूंना पेनल्टी कॉर्नरचा लाभ उठवता आलेला नाही. भारतीय संघासमोर पेनल्टी कॉर्नरची समस्या दिसून आल्याने या शिबिरात भारतीय संघाकडून पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याच्या सरावावर भर दिला जात आहे. या शिबिरात रुपिंदरपाल सिंग यांचे महिला हॉकीपटूंना पेनल्टी कॉर्नर संदर्भात मार्गदर्शन मिळत आहे.
रांची येथे पुढील महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या ऑलिम्पिक पात्र फेरी स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघाचा जोरदार सराव सुरू झाला आहे. त्यांना शिबिरामध्ये अनुभवी प्रशिक्षकाकडून मार्गदर्शन मिळत आहे. अलिकडेच भारतीय महिला हॉकी संघाने रांचीमध्ये आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा जिंकताना बलाढ्या जपानचा पराभव केला होता. पण भारतीय संघाला या सामन्यात अनेक पेनल्टी कॉर्नर मिळूनही त्याचा लाभ घेता आला नाही. भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक स्कोपमन यांनी तातडीने संघाच्या या उणीवावर लक्ष दिले असून त्यांनी या शिबिरात पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविण्याचा सराव करवून घेत आहेत. भारतीय महिला संघातील गुरूजीत कौर हिने या शिबिरात पेनल्टी कॉर्नरवर अचूक गोल नोंदविण्याचा सराव केला. ऑलिम्पिक पात्र फेरीची हॉकी स्पर्धा 13 ते 19 जानेवारी दरम्यान रांची येथे होणार आहे. या पात्र फेरीच्या स्पर्धेत भारतीय महिला संघाचा ब गटात समावेश असून न्यूझीलंड, इटली आणि अमेरिका यांचाही या गटात सहभाग आहे. तर जर्मनी, जपान, चिली आणि झेक प्रजासत्ताक यांचा अ गटात सहभाग राहिल. 2024 साली पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा होत असल्याने ही पात्र फेरीची स्पर्धा सर्व संघांना महत्त्वाची राहिल.