पेगुला, केनिन, मेदवेदेव्ह, पॉल दुसऱ्या फेरीत
अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम : कोस्ट्युक, स्विटोलिना, पाओलिनी यांचेही विजय, व्हीनस विल्यम्स, व्रेसिकोव्हा पराभूत
वृत्तसंस्था, न्यूयॉर्क
अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत जेसिका पेगुला, सोफिया केनिन, कोस्ट्युक, डॅनिल मेदवेदेव्ह यांनी विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली तर अमेरिकेच्या वयस्कर व्हीनस विल्यम्सला पुन्हा एकदा सुरुवातीलाच पराभव स्वीकारावा लागला.
महिला एकेरीत तिसऱ्या मानांकित जेसिका पेगुलाने विजयी सलामी देताना एलेना गॅब्रिएला रुसचा 6-3, 6-2 असा पराभव केला. या मोसमात पेगुलाने ग्रँडस्लॅम स्पर्धेत 46 सामने जिंकले आहेत. ही स्पर्धा जिंकली तर तिला अग्रस्थान मिळू शकते. पण याचवेळी रायबाकिना पराभूत होण्याची तिला आशा करावी लागेल. पेगुलाची पुढील लढत अमेरिकन वाईल्डकार्डधारक सोफिया केनिनशी होईल. अकराव्या मानांकित कोस्ट्युकने स्टॉर्म हंटरचा 6-4, 6-1 असा पराभव केला. तिने विम्बल्डनमध्ये उपांत्य फेरी गाठली होती. महिलांच्या अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या वयस्कर व्हीनस विल्यम्सला पहिल्याच फेरीतून स्पर्धेबाहेर पडावे लागला. 26 व्यांदा या स्पर्धेत सहभागी झालेल्या 46 वर्षीय व्हीनसला सोफिया केनिनने 6-2, 7-6 (8-6) असा पराभव केला. नववी मानांकित इलिना स्विटोलिना, 19 वी मानांकित जस्मिन पाओलिनी, 31 वी मानांकित लैला फर्नांडेझ यांनीही विजय मिळवित दुसरी फेरी गाठली. 27 वी मानांकित बार्बरा क्रेसिकोव्हाला मात्र कॅमिला रखिमोव्हाकडून 6-7 (4-7), 2-6 असा पराभव स्वीकारावा लागला.
2021 मध्ये ही स्पर्धा जिंकणाऱ्या सातव्या मानांकित डॅनिल मेदवेदेव्हने दुसरी फेरी गाठताना ह्युगो गॅस्टनवर 6-4, 6-2, 6-4 अशी मात केली. अमेरिकेच्या 20 मानांकित टॉमी पॉलने एका सेटची पिछाडी भरून काढत हाँगकाँगच्या कोलमन वाँगवर 6-7 (3-7), 6-1, 6-3, 6-3 असा विजय मिळविला. 15 व्या मानांकित अलेक्झांडर बुबलिकने जे जे वुल्फला हरवून दुसरी फेरी गाठली.
पावसाचा अडथळा
पावसाच्या व्यत्ययामुळे सात सामने रविवारी पूर्ण होऊ शकले नव्हते. सरकते छत असलेल्या कोर्टवर काही सामने घेण्यात आले. पण तांत्रिक अडचणीमुळे तेथेही सामन्याला विलंब झाला. 2014 मध्ये ही स्पर्धा जिंकणारा मारिन सिलिक व 2022 चा उपविजेता कॅस्पर रुड यांनी दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली.