पेगुला-गॉफ अंतिम लढत
वृत्तसंस्था, मॅसन
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील सिनसिनॅटी ओपन 1000 मास्टर्स आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महिलांच्या विभागात अमेरिकेच्या जेसिका पेगुला आणि कोको गॉफ यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होत आहे. तर पुरुष एकेरीमध्ये अमेरिकेचा टिफोई तसेच फ्रान्सचा आर्थर फिल्स यांच्यात अंतिम सामना खेळविला जाईल. या स्पर्धेच्या 56 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला एकेरीच्या जेतेपदासाठी अमेरिकेच्या दोन टेनिसपटूंमध्ये लढत होत आहे.
महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने पोलंडच्या स्वायटेकचा 7-5, 4-6, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. यावर्षीच्या टेनिस हंगामातील पेगुलाचा हा 45 वा विजय आहे. या पराभवामुळे स्वायटेकची गेल्या 10 सामन्यातील विजयाची मालिका खंडीत झाली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफने झेकच्या बेलजेकचा 6-4, 6-1 असा फडशा पाडत अंतिम फेरी गाठली. झेकच्या नवोदीत 20 वर्षीय बेलजेकने या स्पर्धेत बेलारुसची टॉप सिडेड साबालेंका तसेच अमेरिकेच्या मॅडिसन किजचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती. या स्पर्धेच्या इतिहासात 1970 साली रोझी कॅसल्स आणि नॅन्सी रिचे या दोन अमेरिकन महिला टेनिसपटूंमध्ये अंतिम लढत झाली होती.
पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या टिफोईने आपल्याच देशाच्या नाकाशिमाचा 7-5, 6-3 असा फडशा पाडत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. तर फ्रान्सच्या आर्थर फिल्सने कोबोलीचा 6-3, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन कृष्णवर्णीय टेनिसपटूंमध्ये यावेळी अंतिम फेरीची लढत होत आहे.