पेडणे टॅक्सीमालकांचे आंदोलन मागे
सरकारकडून रात्री उशिरा मिळाले लेखी पत्र
पेडणे : पेडणे तालुक्यातील टॅक्सी व्यावसायिकांनी आपल्या मागण्यांसाठी तब्बल सहा दिवस पेडणे शहरात शांततापूर्ण मार्गाने आंदोलन केल्यानंतर काल मंगळवारी रात्री उशिरा त्यांना सरकारने ज्या मागण्या मान्य केल्या आहेत, त्यांची लेखी माहिती दिली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात येत असल्याची माहिती रात्री उशिरा अॅड. अमित सावंत यांनी पत्रकारांना दिली.
आंदोलनाची दखल घेऊन पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी याबाबत सरकारकडे वेळोवेळी चर्चा केली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी टॅक्सी व्यावसायिकांच्या सहा मागण्यांपैकी पाच मागण्या मान्य केल्या होत्या. सरकारने लेखी पत्र देण्यास विलंब लावल्यामुळे काल सहाव्या दिवशीही आंदोलन दिवसभर सुरू होते. रात्री उशिरा लेखी पत्र देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 26 रोजी संबंधित अधिकारी आणि टॅक्सी व्यावसायिकांच्या शिष्टमंडळासोबत तब्बल दोन ते अडीच तास चर्चा करून यावर तोडगा काढला होता. एवढेच नव्हे, तर सहा मागण्यांपैकी पाच मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. याबाबतचे लेखी पत्र टॅक्सी व्यावसायिकांना 27 रोजी दुपारपर्यंत दिले जाईल, अशी ग्वाही देण्यात आली होती, काल रात्री उशिरा पत्र देण्यात आले, त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.