पेडणेच्या पुनव उत्सवाला भाविकांचा महासागर; श्री देवी भगवतीच्या दर्शनासाठी हजारोंची मांदियाळी
पुनव उत्सवानिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. शिस्तबद्ध दर्शनव्यवस्थेमुळे भाविकांना देवीचे दर्शन घेणे सुलभ झाले. अनेक भाविकांनी देवीची ओटी भरून मनोभावे पूजाअर्चा केली आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आशीर्वाद घेतले. मंदिराच्या मांगरातील श्री देव रवळनाथ आणि श्री देव भूतनाथ यांच्या तरंगांचे दर्शन घेण्यासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
गोव्यातील विविध तालुक्यांसह सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्राच्या इतर भागांतून भाविक मोठ्या संख्येने पेडण्यात दाखल झाले होते. पुनवेच्या दिवशी देवीचे दर्शन घेणे, ओटी भरणे आणि नवस पूर्ण करणे याला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण आणि लहान मुलांचाही दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
मान्यवरांनी घेतले देवीचे दर्शन
पुनव उत्सवानिमित्त गोवा भाजपच्या प्रभारी खासदार डॉ. भारती पवार, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार प्रवीण आर्लेकर, मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर, मिशन फॉर लोकलचे संस्थापक व पेडणे मतदारसंघातील मगोपचे नेते राजन कोरगावकर, पेडणे विकास मंचाचे अध्यक्ष डॉ. संजय कोरगावकर, पेडणे हित मंचचे अध्यक्ष विलास तांबोसकर, पेडणे विकास सेवा ट्रस्टचे अध्यक्ष उत्तम पार्सेकर आणि माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्यासह विविध मान्यवरांनी श्री देवी भगवतीचे दर्शन घेतले.
आकर्षक स्टॉल्समुळे परिसराला जत्रेचे स्वरूप
पुनव उत्सवानिमित्त मंदिर परिसरात विविध वस्तू, मिठाई, कपडे, मांड्यांसह खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात आले होते. विविध दुकानांमुळे परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी खरेदीचाही आनंद घेतला. त्यामुळे मंदिर परिसरात दिवसभर मोठी वर्दळ पाहायला मिळाली. स्थानिक व्यापारी आणि विक्रेत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते.
परंपरा आणि श्रद्धेचा अनोखा संगम
पेडणेचा पुनव उत्सव ही केवळ धार्मिक यात्रा नसून येथील सांस्कृतिक परंपरा आणि लोकजीवनाचा अविभाज्य भाग आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या परंपरेमुळे भाविकांचे देवीशी असलेले नाते अधिक दृढ होत आहे. मंदिरातील भक्तिमय वातावरण, दर्शनासाठी लागलेल्या रांगा आणि परिसरातील उत्सवी चैतन्य यांमुळे पेडणे नगरीत सर्वत्र भक्तीचा जागर अनुभवायला मिळाला. उत्सवादरम्यान भाविकांची गर्दी लक्षात घेऊन परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
