नवरात्रोत्सवादरम्यान विशेष संसद अधिवेशन?
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या नवरात्रोत्सवादरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन आमंत्रित केले जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. दिल्लीत आता सुरू असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या समाप्तीनंतर सरकार यावर निर्णय घेऊ शकते. पावसाळी अधिवेशन स्थगित न केल्यामुळे विशेष अधिवेशनाबाबत अटकळ बांधली जात आहे. ‘ब्रिक्स’नंतर महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयके मंजूर करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायचे की नाही, याचा निर्णय सरकार घेईल.
सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा पर्याय खुला ठेवला आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन स्थगित करण्यात आले नव्हते. त्यामुळे, सरकार विशेष अधिवेशन बोलावू शकते अशी जोरदार चर्चा होती, परंतु विशेष अधिवेशनासंदर्भात सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिक्स शिखर परिषदेनंतर सरकार विशेष अधिवेशनाचा निर्णय घेऊ शकते.
संसदेचे पावसाळी अधिवेशन दोन्ही सभागृहांमधील गदारोळामुळे गोंधळातच पार पडले. दररोज सहा तासांचे अधिवेशन गृहीत धरल्यास, 15 दिवसांत 90 तासांचे कामकाज पूर्ण व्हायला हवे होते. तथापि, या अधिवेशनात लोकसभेचे कामकाज केवळ 15 तास आणि 36 मिनिटेच झाले, तर राज्यसभेचे कामकाज 15 दिवसांत केवळ 24 तास आणि 21 मिनिटेच चालले. यामुळे नजिकच्या काळात विशेष अधिवेशन बोलावण्याबाबत अटकळ बांधली जात आहे.