For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारवार लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान

10:42 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
कारवार लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान
Advertisement

73.52 टक्के मतदानाची नेंद : यल्लापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक तर सर्वात कमी कुमठा मतदारसंघात

Advertisement

कारवार : काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता कारवार लोकसभा मतदारसंघात मंगळवारी शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणूक रिंगणातील 13 उमेदवारांचे भविष्य मतयंत्रात बंद झाले. कारवार मतदारसंघात 73.52 टक्के मतदानाची नेंद झाली आहे. सर्वात अधिक मतदानाची नोंद यल्लापूर विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी मतदानाची नोंद कुमठा विधानसभा मतदारसंघात झाली आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या मतदानाची नोंद पुढीलप्रमाणे

Advertisement

खानापूर 71.87 टक्के, कित्तूर 75.25, शिरसी 76.06, यल्लापूर 79, कारवार 71.61, कुमठा 70.10, हल्याळ 72.35, भटकळ 73 टक्के याप्रमाणे मतदान झाले.अपेक्षेप्रमाणे सकाळी 7 पासून मतदानासाठी मतदार बाहेर पडले. 85 वर्षांवरील मतदारांसाठी जिल्हा प्रशासनाने वाहनांची सोय केली होती. मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रे आकर्षकरीत्या सजविण्यात आली होती. त्यामुळे अनेक मतदान केंद्रांना एक आगळा वेगळा लूक प्राप्त झाला होता.सकाळी 7 वा. मतदानाला सुरुवात होताच मतदारसंघातील 5 मतदान केंद्रातील यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. यामध्ये कारवारमधील दोन, कित्तूर, यल्लापूर आणि शिरसीमधील प्रत्येकी एक मतदानयंत्राचा समावेश होता. मतदान यंत्रात बिघाड झाल्याने 45 मिनिटे ते 1 तास मतदानाला उशीर झाला. यंत्रातील बिघाडाचा अपवाद वगळता मतदारसंघात अन्य कोणतीही गंभीर स्वरुपाची घटना घडली नाही.

दांपत्याचे होडीतून येऊन मतदान

अंकोला तालुक्यातील कुर्वे येथील मोहन आणि सविता या दांपत्याने स्वत:च्या होडीतून येऊन दांडेबाग शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर येथील सरकारी उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

अघोषित कर्फ्यू

मतदानानिमित्त खासगी तसेच सार्वजनिक आस्थापनांना सुटी देण्यात आली होती. त्यामुळे मतदारसंघातील अनेक ठिकाणी छोटी-मोठी व्यावसायिक आस्थापने बंद होती. त्यामुळे लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. जिल्ह्यातील राष्ट्रीय हमरस्त्यावरील वाहतुकीतही घट झाली होती. काँग्रेस आणि भाजप उमेदवारांचा अपवाद वगळता संपूर्ण मतदारसंघात अन्य अकरा उमेदवारांचे लढतीत अधिक अस्तित्व दिसून आले नाही.

6 वाजल्यानंतरही मतदान

मतदानाची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होती. तथापि, 6 वाजल्यानंतरही अनेक ठिकाणी मतदान सुरू होते. कारण सहा वाजण्यापूर्वी मतदानासाठी मतदान केंद्रांवर आलेल्या मतदारांना टोकन देऊन मतदानाची संधी उपलब्ध करून दिली होती.

भाजप-काँग्रेसकडून बाजीचा दावा

भाजप आणि काँग्रेसच्या समर्थकांकडून बाजी मारण्याचा दावा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी मतदारांनी आपल्यालाच मतदान केले आहे, असा दावा भाजप समर्थकांनी केला आहे. मतदारसंघात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि ठप्प झालेल्या विकासकामांना चालना देण्यासाठी मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांना आशीर्वाद दिले आहेत, असा दावा काँग्रेस समर्थकांनी केला आहे.

अलीगद्दा अंगणवाडी मतदान केंद्रात डी.सी.नी बजावला मतदानाचा हक्क

कारवार लोकसभा मतदारसंघात यावेळी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी गांभीर्याने प्रयत्नशील असलेल्या जिल्हा निवडणूक अधिकारी आणि कारवार जिल्हाधिकारी गंगुबाई माणकर यांनी अलीगद्दा येथील अंगणवाडी मतदान केंद्रावर कन्येसोबत मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीच्या रिंगणातील भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी शिरसी तालुक्यातील कुळवे येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. येथील सेंट मायकेल माध्यमिक शाळेतील मतदान केंद्रावर एकाच कुटुंबातील दहा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Advertisement
Tags :

.