सीमेवर शांतता, दहशतवादाविरुद्ध एकजूट
दहशतवादाविरुद्ध चीननेही पाठबळ द्यावे : जिनपिंग भेटीत पंतप्रधान मोदींची अपेक्षा
वृत्तसंस्था/ बीजिंग
सात वर्षांनंतर चीनला पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेतली. दोघांमध्ये 50 मिनिटे चर्चा झाली. यामध्ये सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासोबतच मोदींनी दहशतवादाचा मुद्दाही उपस्थित केला. मोदींनी दहशतवादाला जागतिक समस्या असे संबोधत त्याविरुद्धच्या लढाईत चीनचा पाठिंबा मागितला. यासोबतच त्यांनी जिनपिंग यांना भारतात आयोजित ब्रिक्स 2026 मध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. एससीओ बैठकीपूर्वी दोन्ही देशाच्या शिष्टमंडळाने विविध मुद्यावर द्विपक्षीय वार्ता पूर्ण केल्या. आता पंतप्रधान मोदी सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत.
पंतप्रधान मोदींनी जिनपिंग यांच्यासमोर दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आहे. मे महिन्यात काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात 26 लोकांचा मृत्यू झाला होता. हाच मुद्दा पकडत पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरोधातील लढाईत चीनची साथ मागितली आहे. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्ये झालेल्या चर्चेत महत्त्वाचे मुद्दे प्राधान्याने मांडण्यात आले. या बैठकीनंतर भारत आणि चीनमधील सहकार्याचा फायदा 2.8 अब्ज लोकांना होणार असल्यामुळे संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा मार्ग मोकळा होईल, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला. त्याचवेळी जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदींना भेटून आनंद झाल्याचे स्पष्ट करत ड्रॅगन (चीन) आणि हत्ती (भारत) एकत्र आले पाहिजेत, असे मोठे विधान करत मैत्रीचा हात पुढे केला. मोदी-जिनपिंग भेटीबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी माध्यमांना माहिती दिली. भारत आणि चीनमधील चांगले संबंध आपल्या आर्थिक विकासासाठी आणि जगासाठी महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
जिनपिंग यांना भारत भेटीचे आमंत्रण
पंतप्रधान मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना भारतात होणाऱ्या ब्रिक्स 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. भारत 2026 मध्ये 18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. यापूर्वी, 17 वी ब्रिक्स शिखर परिषद ब्राझीलमध्ये झाली होती. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेची तयारी आतापासूनच सुरू करण्यात आली आहे.
चीन-भारत हे शत्रू नाहीत, तर मित्र : जिनपिंग
पंतप्रधान मोदींशी झालेल्या संभाषणानंतर जिनपिंग यांनी माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी चीन आणि भारत हे शत्रू नाहीत, तर भागीदार आहेत आणि दोन्ही देश एकमेकांसाठी धोका नाहीत तर विकासाची संधी असल्याचे नमूद केले. जोपर्यंत दोन्ही देश त्यांचे संबंध सुधारण्यासाठी काम करत राहतील तोपर्यंत आपण विकास करत राहू, असे जिनपिंग म्हणाले. चीन आणि भारताने चांगले शेजारी आणि एकमेकांना यशस्वी होण्यास मदत करणारे मित्र बनले पाहिजे. भारत आणि चीनमधील चांगले संबंध जगासाठी महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
जपानच्या दोन दिवसांच्या भेटीनंतर मोदी शनिवारी संध्याकाळी चीनमध्ये पोहोचले होते. जून 2020 मध्ये गलवान संघर्षानंतर भारत-चीन संबंध बिघडले. या भेटीचा उद्देश दोन्ही देशांमधील सीमा वाद कमी करणे हादेखील आहे. त्याबाबत द्विपक्षीय बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे स्पष्ट करण्यात आले नसले तरी शांतता प्रस्थापित करण्यावर भर देण्यात आला.
द्विपक्षीय बैठकीनंतर तियानजीन शहरात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीत मोदी सहभागी झाले होते. यावेळी इतिहासातील सर्वात मोठी एससीओ शिखर परिषद चीनमध्ये आयोजित करण्यात आली आहे. 20 हून अधिक देश त्यात सहभागी होत आहेत. मोदी आणि पुतिन यांच्यासोबत मध्य आशिया, मध्य पूर्व, दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियातील नेते देखील या शिखर परिषदेला उपस्थित राहतील.
द्विपक्षीय बैठकीतील महत्त्वाच्या घडामोडी
► संबंधांमधील प्रगतीवर भर : नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांनी गेल्या एका वर्षात दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सातत्याने प्रगती होत असल्याचे मान्य केले. मतभेदांचे रुपांतर वादात होऊ नये आणि भागीदारीला प्राधान्य दिले पाहिजे, असे दोघांनीही मान्य केले.
► थेट उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची घोषणा : भारत आणि चीनमधील थेट विमानो•ाणे पुन्हा सुरू होतील, अशी घोषणा मोदींनी केली. कोविड-19 महामारीदरम्यान या सेवा बंद केल्यामुळे प्रवाशांना हाँगकाँग किंवा सिंगापूर मार्गे जावे लागत होते.
► कैलाश मानसरोवर यात्रा आणि व्हिसा : कैलाश मानसरोवर यात्रा आणि पर्यटक व्हिसा पुन्हा सुरू करणे हे दोन्ही देशांमधील परस्पर विश्वासाचे प्रतीक असल्याचे मोदी म्हणाले. चीनने आधीच ही यात्रा पुन्हा सुरू केली आहे. तर भारताने अलीकडेच चिनी नागरिकांना पर्यटक व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे.
► धोरणात्मक स्वायत्ततेवर भर : भारत-चीन संबंध तिसऱ्या देशाच्या दृष्टिकोनातून पाहू नयेत. दोन्ही देशांनी जागतिक दहशतवाद आणि निष्पक्ष व्यापार यासारख्या मुद्यांवर सामायिक सहकार्य वाढवण्याबद्दल चर्चा केली.
► गलवान वादानंतर शांतता : 2020 मध्ये गलवान संघर्षानंतर संबंध तणावपूर्ण बनले, परंतु दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवल्यामुळे आता सीमेवर शांतता आणि स्थिरता आहे. या सौहार्दामुळे परस्पर विश्वास वाढला आहे.
► ‘मैत्रीपूर्ण शेजारी’ असा उल्लेख : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारत आणि चीन चांगले शेजारी आणि मित्र असल्याचे म्हटले. तसेच दोन्ही देशांनी त्यांच्या नागरिकांच्या कल्याणासाठी एकत्र काम केले पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त केली.
► सीमावादाचा अडसर नको : सीमावाद हा संबंधांचा आधार बनवू नये यावर शी जिनपिंग यांनी भर दिला. त्यांनी दीर्घकालीन आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून संबंध स्थिर आणि सकारात्मक बनवण्याबद्दल भाष्य केले.
► अर्थव्यवस्था आणि बाजारपेठेतील सहकार्य : भारताच्या ईव्ही क्षेत्राला चिनी कंपन्यांकडून फायदा होऊ शकतो. तर चीनला भारतीय बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळाल्याने मोठा आर्थिक फायदा होईल. या सहकार्यामुळे दोघांची अर्थव्यवस्था मजबूत होईल.
► सीमा व्यापार पुन्हा सुरू : परराष्ट्र मंत्र्यांच्या अलिकडच्या चर्चेनंतर, दोन्ही देशांनी सीमापार व्यापार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे व्यापारात विविधता येईल आणि दुर्मिळ खनिजे, खते आणि टनेल बोरिंग मशीन यासारख्या आवश्यक वस्तूंचा पुरवठा भारताला सुनिश्चित होईल.
► अमेरिकन टॅरिफमुळे नवीन समीकरण : ट्रम्प प्रशासनाने भारतावर मोठे टॅरिफ लादल्यानंतर भारत आणि चीन यांच्यातील राजनैतिक जवळीक वाढली आहे. अशा परिस्थितीत, भारत-चीन मैत्री अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणासाठी आव्हान बनू शकते आणि दशकांची रणनीती बदलू शकते.