For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एकीकडे शांतता, दुसरीकडे संघर्ष

06:36 AM Jun 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
एकीकडे शांतता  दुसरीकडे संघर्ष
Advertisement

इस्रायल-लेबनॉनमध्ये सामंजस्य करार : अमेरिका-इराण यांच्यात पुन्हा हल्ले

Advertisement

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन, तेहरान

Advertisement

अमेरिका, इस्रायल आणि लेबनॉन वॉशिंग्टनमध्ये एका त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी करत असतानाच, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका मालवाहू जहाजावर हल्ला केला. यानंतर अमेरिकेने इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन तळांवर बॉम्बहल्ला केल्यानंतर इराणी लष्कराने अमेरिकेच्या तळांना लक्ष्य करून प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यांमुळे पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली असून दोन्ही देशांमधील वरिष्ठ नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकीही झडत आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार होऊनही पुन्हा हल्ले सुरू झाल्याने युद्धविरामाला ब्रेक लागला आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका मालवाहू जहाजावर इराणने हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा वाढला आहे. प्रत्युत्तरादाखल, अमेरिकेने इराणच्या क्षेपणास्त्र, ड्रोन आणि रडार केंद्रांवर हल्ले केले. प्रत्युत्तर म्हणून इराणी सैन्याने अमेरिकी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. अमेरिकन सैन्याने इराणमधील क्षेपणास्त्र आणि ड्रोन तळ तसेच रडार केंद्रांवर हल्ला केला आहे, असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने म्हटले आहे. या हल्ल्यांमध्ये इराणचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. यानंतर, इराणी सैन्याने मध्य-पूर्वेतील अमेरिकी तळांवरही क्षेपणास्त्र हल्ले केले.

जेडी व्हान्स यांचा इराणला कडक इशारा

दोन्ही बाजू आपल्या हल्ल्यांचे समर्थन करत आहेत. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी भाष्य करत ‘अमेरिका आणि इराण यांच्यातील हे हल्ले थांबणार नाहीत. हिंसेला हिंसेनेच उत्तर दिले पाहिजे’, असे स्पष्ट केले आहे. इराणने शस्त्रसंधी करारावर स्वाक्षरी केली आहे. आम्ही त्याचा आदर करतो. जर त्यांनी अशा कराराचे उल्लंघन केले, तर सामंजस्य कराराची अंमलबजावणी कशी होईल? सामंजस्य कराराची अंमलबजावणी कशी करायची याबद्दल त्यांच्यात काही मतभेद असल्यास, ते फोन करून स्पष्टीकरण देऊ शकतात. असे हल्ले करण्यात काय अर्थ आहे? पण आता हिंसेला हिंसेनेच उत्तर दिले जाईल, असा इशारा व्हान्स यांनी दिला आहे.

इस्रायल-लेबनॉन यांच्यात फ्रेमवर्क करार

शुक्रवारी वॉशिंग्टनमध्ये चार दिवसांच्या चर्चेनंतर अमेरिका, इस्रायल आणि लेबनॉन यांनी एका त्रिपक्षीय फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी केली. मध्यपूर्वेतील या दोन दीर्घकाळच्या कट्टर शत्रूंमध्ये शांतता कराराचा मार्ग मोकळा करणे, हे या कराराचे उद्दिष्ट आहे. बैठकीनंतर ‘अमेरिकेच्या मध्यस्थीने आणि पाठिंब्याने लेबनॉनचे सार्वभौम सरकार आणि इस्रायलचे सरकार यांच्यात एक फ्रेमवर्क करार झाला आहे’, असे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी जाहीर केले. हा करार कायमस्वरूपी शांतता आणि सुरक्षेसाठी एक चौकट तयार करण्याच्या सुरुवातीचे प्रतीक आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणावाची स्थिती

अमेरिका व इराण यांच्यातील शांतता करारानंतर परिस्थिती पुन्हा एकदा चिघळत असल्याचे दिसत आहे. अमेरिका आणि इराणने 17 जून रोजी फ्रान्समध्ये एका शांतता करारावर स्वाक्षरी केल्यानंतर पश्चिम आशियातील स्थिरतेसाठी एक नवी सुरुवात मानले जात होते. मात्र, आता या कराराच्या मूळ स्वरूपावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दोन्ही बाजू एकमेकांवर युद्धविराम मोडल्याचा आरोप करत आहेत. इराणने प्रथम हल्ला केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. अवघ्या 10 दिवसांनंतर तणाव पुन्हा वाढत असल्याचे दिसत आहे.

इराणच्या सैन्याने अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. मात्र ही कारवाई प्रत्युत्तरादाखल होती असा त्यांचा दावा आहे. अमेरिकेने शुक्रवारी रात्री इराणवर मोठा हल्ला चढवत त्यांच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन तळांना लक्ष्य करण्यात आले. अमेरिकेच्या आक्रमकतेला आणि कराराच्या उल्लंघनाला प्रत्युत्तर म्हणून आयआरजीसी नौदलाने या ठिकाणांवर हल्ला केला, असे इराणने म्हटले आहे.  इराणचे खासदार इब्राहिम अझीझी यांनी अमेरिकेवर तीव्र टीका केली. चर्चेदरम्यान हल्ला करून अमेरिकेने त्यांना चर्चेची किंवा शस्त्रसंधीची पर्वा नसल्याचे दाखवून दिले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.