माळमारुती-खडेबाजार पोलिसांकडून शांतता समिती बैठका
बेळगाव : रमजान आणि होळी सण शांततेत पार पाडावेत यासाठी पोलीस खात्याकडून ठाणेनिहाय शांतता समिती बैठका घेतल्या जात आहेत. मंगळवारी खडेबाजार आणि माळमारुती पोलीस ठाण्यात शांतता समिती बैठका घेण्यात आल्या. दोन्ही सण शांततेत साजरे करावेत, कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा समाजकंटकांची गय केली जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. मुस्लीम बांधवांचा रमजान सण सुरू असून गुरुवार दि. 13 रोजी होळी आणि दुसरे दिवशी म्हणजे शुक्रवारी रंगपंचमी आहे. त्यामुळे या काळात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी पोलीस खात्याकडून खबरदारी घेतली जात आहे. मंगळवारी माळमारुती आणि खडेबाजार पोलिसांकडून शांतता सभा घेण्यात आल्या. यावेळी एसीपी संतोष सत्यनाईक, शेखराप्पा एच., पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, श्रीशैल गाबी आदी उपस्थित होते.