गुंजी माउलीदेवी यात्रोत्सवनिमित्त शांतता समितीची बैठक
प्रसिद्ध देवस्थान श्री माउली देवी यात्रोत्सवास शनिवारपासून प्रारंभ
वार्ताहर/गुंजी
गुंजी येथील जागृत व प्रसिद्ध देवस्थान श्री माउलीदेवी यात्रोत्सवास शनिवारपासून प्रारंभ होणार आहे. त्यानिमित्त मंगळवारी सायंकाळी खानापूर तालुक्याचे तहसीलदार व न्याय दंडाधिकारी प्रकाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. सुऊवातीस विलास पाटील यांनी शब्दसुमनाने उपस्थितांचे स्वागत केले तर उत्सव कमिटीच्यावतीने रावजी बिरजे यांनी प्रास्ताविक करून सभेचा उद्देश सांगितला. यावेळी चर्चा करताना उत्सव कमिटीचे अध्यक्ष राजाराम देसाई यांनी गुंजी माउली देवीचा पूर्वेतिहास सांगून देवीची जागृतता आणि प्रसिद्धी अधोरेखित केली. त्याचबरोबर हेस्कॉम, आरोग्य, पोलीस, परिवहन खात्याकडून यात्रा काळात सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी तहसीलदार गायकवाड यांनी बोलताना सांगितले की, यात्रोत्सव काळात सर्व खात्याकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. त्यासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना योग्यवेळी सूचना केल्या जातील, असे आश्वासन दिले. तसेच नंदगड पोलीस निरीक्षक एस. सी. पाटील यांनी पोलीस खात्याकडून संपूर्ण सहकार्य करण्याचे सांगून उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर लोंढा पोलीस उपनिरीक्षक निरंजन स्वामी, खेमान्ना घाडी आदींनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी खानापूरचे पोलीस उपनिरीक्षक एम. गिरीश, गुंजी महसूल निरीक्षक संजीव मुडली, ग्रा. पं. अध्यक्ष संतोष गुरव, दीपक देसाई, दिनेश कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते महेश कोडोळी, उत्सव कमिटीचे सदस्य, पंच, पुजारी, ग्रामपंचायतीचे सदस्य, सचिव आणि कर्मचारी वर्ग, पोलीस कर्मचारी वर्ग व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.