मोहरम शांततेत साजरा करण्याबाबत नंदगड येथे शांतता समितीची बैठक
वार्ताहर/नंदगड
नंदगड येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोहरम शांततेत साजरा करावा, अशी सूचना नंदगड पोलीस स्थानकाचे निरीक्षक एस. सी. पाटील यांनी केले. मोहरम शांततेत साजरा करण्या संदर्भात नंदगड पोलीस स्थानकात सार्वजनिक बैठक बोलवण्यात आली होती. विविध धर्माचे लोक या बैठकीला उपस्थित होते. यावेळी शंकर सोनोळी, विजय कामत, अल्ताफ खानापुरी, आशिफ सय्यद, सुभाष पाटील, रोहित गुरव आदींसह अन्य लोकांनी विचार मांडले.
नंदगड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अनेक गावांतील लोकही उपस्थित होते. मोहरमनिमित्त सकाळपासून सायंकाळपर्यंत करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबद्दल माहिती त्या त्या गावातील लोकांनी दिली. ताबूतची मिरवणूक कोणत्या मार्गाने जाते याची माहिती दिली. त्या दृष्टीने पोलिसांकडून सहकार्य केले जाणार आहे. बैठकीत सर्वांच्या विचारविनिमयातून मोहरम सण शांततेत साजरा करून नंदगडचा आदर्श कायम अबाधित ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. पीएसआय बदामी यांनी मोहरम सण व तो सण साजरा करण्याबाबतची सविस्तर माहिती दिली.