For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पीसीबीकडून पाकच्या 7 खेळाडूंची इंग्लंड दौऱ्यावरून परत पाठवणी

06:00 AM Sep 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
पीसीबीकडून पाकच्या 7 खेळाडूंची इंग्लंड दौऱ्यावरून परत पाठवणी
Advertisement

मुख्य प्रशिक्षक सर्फराज अहमद, गोलंदाजी प्रशिक्षक गुलचीही हकालपट्टी, निर्णय हास्यास्पद : आर्थर

Advertisement

वृत्तसंस्था/कराची

इंग्लंडमधील कसोटी मालिकेदरम्यान दोन प्रशिक्षकांना हटवल्यामुळे आणि सात खेळाडूंना मायदेशी परत पाठवल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळावर माजी खेळाडूंकडून कडक टीका होत आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांत पाकिस्तानचा अत्यंत निराशाजनक पराभव झाला. पाहुण्या संघाला मालिकेतील पहिला सामना एका डाव आणि 103 धावांनी गमवावा लागला, तर दुसऱ्या कसोटीत त्यांना 194 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला.

Advertisement

मायदेशी परत पाठवण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये राष्ट्रीय टी-20 कर्णधार सलमान अली आगा, माजी कर्णधार मोहम्मद रिझवान आणि अनुभवी फलंदाज इमाम-उल-हक यांचा समावेश आहे. बर्मिंगहॅममध्ये 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी या सात खेळाडूंच्या जागी प्रामुख्याने युवा आणि अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पण न केलेल्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तसेच मुख्य प्रशिक्षक सर्फराज अहमद आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांनाही पदावरून हटवण्यात आले आहे.

पाकिस्तानचे माजी मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी या निर्णयाचे वर्णन ‘हास्यास्पद’ असे केले आहे. पीसीबीचा हा निर्णय अत्यंत हास्यास्पद आहे. ते सध्या ज्या गोंधळाच्या स्थितीत आहेत त्याचे कारण हेच आहे की ते सतत खेळाडू, प्रशिक्षक आणि निवड समितीला बदलत असतात आणि त्यात कोणतीही स्थिरता नसते. नियोजन, स्थिरता आणि योग्य रचना यामुळेच सातत्यपूर्ण कामगिरी शक्य होते, असे आर्थर यांनी सोशल मीडियावर लिहिले आह.

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज जावेद मियांदादने या निर्णयाने धक्का बसल्याचे म्हटले आहे. परत पाठवण्यात आलेल्या खेळाडूंसाठी ही बाब आता मानसिक आघातासारखी आणि त्यांच्या कारकिर्दीवर लागलेल्या डागासाठी ठरेल, तर दुसरीकडे बदली खेळाडू म्हणून आलेल्यांवर मालिकेतील राहिलेल्या एका कसोटी सामन्यात प्रचंड मानसिक दडपण असेल, असे मियांदादने मंगळवारी म्हटले. त्याने सांगितले की, पाकिस्तान क्रिकेटमधील आपल्या कारकिर्दीत खेळाडूंचे बंड, फिक्सिंगचे आरोप आणि दाऊण पराभव यासारखे अनेक कठीण प्रसंग त्याने पाहिलेले आहेत, परंतु कोणत्याही मंडळाने अशा प्रकारे प्रतिक्रिया कधीच दिली नव्हती.

माजी कर्णधार रशीद लतीफने म्हटले आहे की, जेव्हा मंडळाने असा निर्णय घेण्याचे ठरवले तेव्हा बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा द्यायला हवा होता. बाबर केवळ बघ्याची भूमिका घेत राहिला व त्याने आपल्या खेळाडूंना वाऱ्यावर सोडले, अशी टीका लतीफने केली आहे.

माजी कर्णधार मोईन खानने म्हटले आहे की, पराभवांची मालिका थांबवण्यासाठी जरी मंडळाला संघात आमूलाग्र बदल करायचे असले, तरी त्यांनी इंग्लंडमधील मालिका संपेपर्यंत वाट पाहायला हवी होती. खेळाडूंना परत पाठवणे आणि मुख्य प्रशिक्षक सर्फराज अहमद व गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांना पदावरून हटवणे यासारखे कठोर निर्णय मंडळाने ज्या घाईघाईने घेतले त्यावरून यामागे वरकरणी दिसते त्यापेक्षा काहीतरी वेगळेच कारण असावे, असेही त्याने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.