For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

पंजाबचा चेन्नईवर रोमांचक विजय

09:40 PM Apr 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
पंजाबचा चेन्नईवर रोमांचक विजय

प्रभसिमरन, लिव्हिंगस्टोन, करन, जितेश, रझा यांची फटकेबाजी, सामनावीर कॉनवेचे अर्धशतक

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

पंजाब किंग्सने येथे झालेल्या आयपीएलमधील सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सला चकित करताना 4 गड्यांनी रोमांचक विजय मिळविला. शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना सिकंदर रझाने शाहरुख खानच्या साथीने तीन धावा पळून काढत विजय साकार केला.

Advertisement

चेन्नईच्या 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला शेवटच्या षटकात विजयासाठी 9 धावांची गरज होती. मथीशा पथिरानाने टाकलेल्या या षटकातील पहिल्या तीन चेंडूवर केवळ 2 धावा निघाल्या. पण प्रचंड दबाव असूनही सिकंदरने संयम राखत नंतरच्या दोन चेंडूवर 2-2 धावा काढल्या. सिकंदरने शेवटचा चेंडू स्क्वेअरलेगच्या दिशेने मारला होता. पण महीश थीक्षणाने तो अडवित चौकार टाळला. मात्र या अवधीत सिकंदर व शाहरुख यांनी तीन धावा पळून काढत चेन्नईचा विजय हिसकावून घेतला आणि स्थानिक चाहत्यांना सुन्न केले. पाच विजयासह पंजाबचे 10 गुण झाले आहेत.

Advertisement

पंजाबने 20 षटकांत 6 बाद 201 धावा जमविल्या. प्रभसिमरन सिंग (42), लियाम लिव्हिंगस्टोन (40), सॅम करन (29), जितेश शर्मा (10 चेंडूत 21) यांनी या विजयात मोलाचे योगदान दिले. चेन्नईने सामनावीर देव्हॉन कॉनवेच्या नाबाद 92 व ऋतुराज गायकवाडच्या 37 धावांच्या बळावर 20 षटकांत 4 बाद 200 धावा फटकावल्या होत्या. मधल्या षटकांत चेन्नईने अचूक मारा करीत पंजाबच्या धावगतीला लगाम घातल्यामुळे पंजाबचा विजय अशक्य वाटत होता. पण लिव्हिंगस्टोन व करन यांनी आक्रमक फटकेबाजी करीत बाजू पलटवली. तुषार देशपांडेने टाकलेल्या 16 व्या षटकात 24 धावा फटकावल्या गेल्या, याच धावा निर्णायक ठरल्या.

शेवटच्या 12 चेंडूत 22 धावांची गरज असताना जितेश शर्माने पहिल्या चेंडूवर चौकार मारला तर पुढच्या चेंडूवर 2 धावा घेतल्या. चौथ्या चेंडूवर त्याने उत्तुंग फटका मारला होता. पण सीमारेषेजवळ बदली खेळाडू शेक रशीदने त्याचा झेल टिपला. झेल घेतल्यानंतर त्याच्या पायाचा स्पर्श सीमारेषेला झाला होता. पण तिसऱ्या पंचांनी तो बाद असल्याचा निर्णय दिला. तुषार देशपांडेने 49 धावांत 3 बळी मिळविले तर रवींद्र जडेजाने 32 धावांत 2 बळी टिपले.

अर्धशतकी सलामी

पंजाबला कर्णधार शिखर धवन व प्रभसिमरन सिंग यांनी पॉवरप्लेमध्ये 4.2 षटकांतच 50 धावांची सलामी दिली. धवनने 15 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 28 धावा फटकावल्या. नंतर अथर्व तायडेसमवेत प्रभसिमरनने 25 चेंडूत 31 धावांची भर घातली. प्रभसिमरनला जडेजाने बाद करीत ही जोडी फोडली. त्याने 24 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांच्या मदतीने 42 धावा फटकावल्या. तायडे 13 धावा काढून बाद झाल्यावर पंजाबची स्थिती 11 व्या षटकांत 3 बाद 94 अशी झाली होती. यानंतरच्या षटकांत चेन्नईने अचूक गोलंदाजी केल्याने पंजाबसाठी धावा निघणे कठीण जाऊ लागले. पण लिव्हिंगस्टोन, करन यांनी फटकेबाजी करीत संघाला विजयासमीप आणले आणि शेवटच्या 8 चेंडूत रझा व शाहरुख यांनी 15 धावा जमवित विजय साजरा केला.

कॉननवेची शानदार खेळी

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी निवडल्यावर कॉनवेच्या शानदार नाबाद 92 धावांच्या आधारावर चेन्नईने निर्धारित 20 षटकांत 4 बाद 200 धावा जमविल्या. शेवटच्या दोन चेंडूवर कर्णधार धोनीने सलग षटकार ठोकत स्थानिक चाहत्यांना खुष केले. त्याने 4 चेंडूत नाबाद 13 धावा तडकावल्या. कॉनवे व गायकवाड यांनी 9.4 षटकांत चेन्नईला 86 धावांची सलामी दिली. कॉनवेने 52 चेंडूत 16 चौकार, एका षटकाराच्या मदतीने नाबाद 92 धावा फटकावल्या तर गायकवाडने 31 चेंडूत 37 धावा काढल्या. याशिवाय शिवम दुबेने 17 चेंडूत 28, मोईन अलीने 6 चेंडूत 10, जडेजाने 10 चेंडूत 12 धावा केल्या. पंजाबतर्फे करन, राहुल चहर, अर्शदीप सिंग सिकंदर रझा यांनी एकेक बळी मिळविले.

संक्षिप्त धावफलक : चेन्नई सुपरकिंग्स 20 षटकांत 4 बाद 200 : गायकवाड 31 चेंडूत 37, कॉनवे 52 चेंडूत 16 चौकार, 1 षटकारासह नाबाद 92, दुबे 17 चेंडूत 28, मोईन अली 6 चेंडूत 10, जडेजा 10 चेंडूत 12, धोनी 4 चेंडूत नाबाद 13, अवांतर 8. गोलंदाजी : अर्शदीप सिंग 1-37, करन 1-46, राहुल चहर 1-35, सिकंदर रझा 1-31.

पंजाब किंग्स 20 षटकांत 6 बाद 201 : प्रभसिमरन सिंग 24 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांस 42, धवन 15 चेंडूत 28, अथर्व तायडे 17 चेंडूत 13, लिव्हिंगस्टोन 24 चेंडूत 1 चौकार, 4 षटकारांसह 40, सॅम करन 20 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह 29, जितेश शर्मा 10 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह 21,  शाहरुख खान नाबाद 2, सिकंदर रझा 7 चेंडूत नाबाद 13, अवांतर 13. गोलंदाजी : तुषार देशपांडे 3-49, जडेजा 2-32, पथिराना 1-32.

Advertisement
Tags :
×

.