For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पेटीएमचे ‘पॉकेट मनी’फिचर सुरु

06:22 AM May 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
पेटीएमचे ‘पॉकेट मनी’फिचर सुरु
Advertisement

आता बँक खात्याशिवाय किशोरवयीन मुलांना करता येणार युपीआय पेमेंट : मासिक मर्यादा 15000 पर्यंत

Advertisement

त् वृत्तसंस्था, नवी दिल्ली

पेटीएमने किशोरवयीन मुलामुलींसाठी ‘पेटीएम पॉकेट मनी’ हे फीचर सुरू केले आहे, ज्याद्वारे ते स्वत:चे बँक खाते न उघडता सुरक्षित डिजिटल पेमेंट करू शकतील. या नवीन फीचरमध्ये, पालक आपल्या मुलांच्या खर्चावर लक्ष ठेवू शकतील, मासिक मर्यादा निश्चित करू शकतील आणि रिअल-टाइम ट्रॅकिंग करण्याची सुविधाही उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.

Advertisement

फिनटेक फर्म वन97 कम्युनिकेशन्स लिमिटेड (पेटीएम) ने सोमवार, 18 मे रोजी याची अधिकृत घोषणा केली आहे. कंपनीच्या निवेदनानुसार, पालक आणि विश्वासू कुटुंबीय आपल्या मुलांना सुरक्षित आणि नियंत्रित पेमेंटची सुविधा देऊ शकतात.

ते आपल्या पेटीएम अॅपद्वारे मुलांसाठी एक निश्चित खर्च मर्यादा सेट करू शकतील. यामुळे, पालक आपल्या मुलांच्या प्रत्येक व्यवहारावर सतत लक्ष ठेवू शकतील आणि त्यांचे नियंत्रण नेहमीच कायम राहील.

दैनंदिन खर्च डिजिटलीकरणाचा प्रयत्न

भारतातील किशोरवयीन मुले खरेदी, मोबाईल रिचार्ज, मेट्रोचे भाडे, कॅब बुकिंग आणि शाळा-कॉलेज कॅन्टीन यांसारख्या दैनंदिन गरजांसाठी सातत्याने डिजिटल पेमेंट करत आहेत. आजकाल, अनेक मुले या खर्चांसाठी पूर्णपणे त्यांच्या पालकांच्या रोख रकमेवर अवलंबून आहेत. ‘पेटीएम पॉकेट मनी’च्या माध्यमातून मुलांना एक सुरक्षित माध्यम मिळेल, जे कुटुंबांना लहानपणापासूनच जबाबदार आर्थिक सवयी विकसित करण्यास मदत करेल.

आता ओटीपी मागण्याची गरज नाही

एकदा हे फीचर सक्रिय झाल्यावर, किशोरवयीन मुले त्यांच्या स्वत:च्या फोनवरील पेटीएम अॅप वापरून ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यापाऱ्यांना सुरक्षित युपीआय पेमेंट करू शकतील. यासाठी आता त्यांना पेमेंट करताना पालकांकडून ओटीपी मागण्याची, त्यांचा फोन घेण्याची किंवा पालकांना व्हॉट्सअॅपवर क्यूआर कोड पाठवण्याची गरज भासणार नाही.

इन-बिल्ट सेफ्टी:

मुलांना ऑनलाइन फसवणूक किंवा चुकीच्या व्यवहारांपासून वाचवण्यासाठी अॅपमध्ये पूर्वनिश्चित सुरक्षा नियम आहेत. जसे की, नवीन अॅक्टिव्हेशनवर सुरुवातीची मर्यादा घालणे, आंतरराष्ट्रीय पेमेंट ब्लॉक करणे आणि पालकांना थेट युपीआय पीनद्वारे संपूर्ण अॅक्सेस ब्लॉक करण्याचा अधिकार देणे.

Advertisement
Tags :

.