पेटीएमचे बाजार भांडवल 22 हजार कोटींनी घटले
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
ऑनलाइन वित्त सेवा देणारी कंपनी पेटीएमचे समभाग शेअर बाजारात दररोज घसरणीचा कल दाखवत आहेत. गेल्या 10 दिवसांच्या काळात नकारात्मकतेमुळे बाजार भांडव मूल्यात 22 हजार कोटी रुपयांचा फटका कंपनीने सहन केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. रिझर्व्ह बँकेच्या कठोर निर्णयानंतर पेमेंट सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या पेटीएमच्या समभागामध्ये गेल्या दहा दिवसांमध्ये सातत्याने घसरण दिसून आली आहे. रिझर्व्ह बँकेने पेटीएमच्या बँकिंग व्यवहारावर निर्बंध घातले आहेत. 29 फेब्रुवारीनंतर बरेचसे व्यवहार होणार नसल्याचे सांगितले जात आहे. बुधवारच्या सत्रातही पेटीएमचे समभाग 9 टक्के इतके घसरणीसह 344 रुपयांवर खाली आले होते. गेल्या जवळपास दहा दिवसांचा एकंदर नुकसानीचा अंदाज घेतल्यास जवळपास 22 हजार कोटी रुपयांचे बाजार भांडवल कंपनीचे कमी झाले असल्याचे दिसून आले आहे. हा सर्वात मोठा धक्का कंपनीसाठी मानला जात आहे.
इतकी टक्के घसरण
गेल्या दहा दिवसात कंपनीचा समभाग जवळजवळ 55 टक्के घसरणीत राहिला होता. या घसरणीमुळे रिटेल गुंतवणूकदारांपासून ते मोठे गुंतवणूकदार, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार व म्युच्युअल फंड हाऊस यांना मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.