‘पेटीएम’चा तोटा पोहचला 839 कोटींवर
पहिल्या तिमाहीमधील आकडेवारी सादर : एका वर्षात समभाग 45 टक्क्यांनी घसरला
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पेटीएमची मूळ कंपनी वन97 कम्युनिकेशन्सला आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत वार्षिक आधारावर 839 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत म्हणजेच 2023-24 मध्ये हा तोटा 357 कोटी रुपये होता. म्हणजेच कंपनीच्या तोट्यात 134 टक्के वाढ झाली आहे. कंपनीच्या महसुलातही घट झाली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत पेटीएमचा महसूल 1,502 कोटी रुपये होता. मागील वर्षी याच तिमाहीत महसूल 2,342 कोटी रुपये होता. म्हणजेच पहिल्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात वार्षिक 36 टक्के घट झाली आहे. पेटीएम पेमेंट बँकेवर आरबीआयच्या बंदीमुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. त्याच वेळी, तिमाही निकालांच्या घोषणेनंतर, पेटीएमचे समभाग सुमारे 1 टक्क्यांनी वाढले आहेत. तो 450 रुपयांवर व्यवहार करत आहे. गेल्या एका वर्षात कंपनीचा समभाग सुमारे 45 टक्क्यांनी घसरला आहे.
तिमाही आधारावर तोटा 53 टक्केपर्यंत वाढला
आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत वार्षिक आधारावर 839 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.
पेटीएम व्यवसायावर आरबीआयची बंदी
31 जानेवारी 2024 रोजी जारी केलेल्या परिपत्रकात, आरबीआयने म्हटले आहे की 29 फेब्रुवारीनंतर (नंतर 15 मार्चपर्यंत वाढविण्यात आले), पेटीएम पेमेंट बँक खात्यांमध्ये पैसे जमा करता येणार नाहीत. या बँकेद्वारे वॉलेट, प्रीपेड सेवा, फास्टॅग आणि इतर सेवांमध्ये पैसे जमा करणे शक्य होणार नाही.