ईडीच्या छाप्यानंतर पायल मोदी यांचे विषप्राशन
रुग्णालयात दाखल : जयश्री गायत्री फूड प्रॉडक्ट्स कंपनीच्या मालकीण
वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशातील जयश्री गायत्री फूड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांच्या मालमत्तांवर ईडीने छापे टाकले. या कारवाईत सुमारे 73 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. कंपनीवरील छाप्यानंतर कंपनीचे संचालक किशन मोदी यांच्या 31 वर्षीय पत्नी पायल मोदी यांनी विषप्राशन केले. गुरुवारी रात्री त्यांना गंभीर अवस्थेत एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
ईडीच्या कारवाईनंतर पायल मोदी यांनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. भोपाळमधील चुनाभट्टी भागात ही घटना घडली. भोपाळ, सेहोर आणि मुरैना येथील जयश्री गायत्री फूड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या जागेवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलले. त्यांची कथित सुसाईड नोटही जप्त करण्यात आली असून त्यामध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि इतर पाच जणांना या कारवाईमागे जबाबदार धरले आहे.
गायत्री फूड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडवर बनावट लॅब प्रमाणपत्रांद्वारे भेसळयुक्त दूध उत्पादने विकल्याचा आरोप आहे. अलीकडेच, ईडीने भोपाळ, सेहोर आणि मुरैना येथील जयश्री गायत्री फूड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. ईडीच्या कारवाईदरम्यान त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून सुमारे 66 कोटी रुपयांची मालमत्ता, 25 लाख रुपये रोख आणि बीएमडब्ल्यू आणि फॉर्च्युनर सारख्या आलिशान कार जप्त करण्यात आल्या. याशिवाय, कंपनीची 6.26 कोटी रुपयांची मुदत ठेव देखील गोठवण्यात आली आहे.