मोबदला द्या...नंतरच बंधाऱ्याचे काम सुरू करा
जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत शेतकऱ्यांची मागणी
बेळगाव : बसुर्ते येथे निर्माण होत असलेला बंधाऱ्याचे काम जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमिनीच्या मोबदल्याचे पैसा जमा होत नाही. तोपर्यंत बंधाऱ्याचे काम बंद ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनीही संबंधित खात्याकडे प्रति एकर 88 लाख रुपये मोबदल्याचा प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिले.
बसुर्ते गावाच्या व्याप्तीत पाणीपुरवठ्याच्या नावाखाली बंधारा बांधण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून 70 एकर जमीन अधिग्रहण करण्यात आले. मात्र शेतकऱ्यांना अद्याप जमिनीचा मोबदला देण्यात आला नाही. यासाठी विविध शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. याला प्रतिसाद देत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपला व्यथा मांडल्या. तसेच जमीनही नाही व हाती पैसाही नसल्याने कुटुंबांचे भविष्य उघड्यावर आले आहे. यामुळे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन आम्हाला दिलासा द्यावा, अशी विनवणी शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनीही जिल्हाप्रशासन तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून तुम्हाला कोणत्याही समस्या होऊ नयेत, याची काळजी घेतली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बंधाऱ्याच्या कामासाठी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडून जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले. यानंतर बंधाऱ्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र जमीन घेऊनही काम सुरू झाले असले तरी अद्याप शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. हातात जमीन व मोबदलाही नसल्याने शेतकऱ्यांवर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.