शाळांची थकीत वीज बिले ग्रामपंचायतीतून भरा
कोल्हापूर :
कोल्हापूर जि.प.अंतर्गत एकूण 1963 शाळा असून त्यापैकी 1079 शाळांमधील 49.08 लाख रकमेची वीज बिले थकीत आहेत. ही बिले भरण्यासाठी शाळांकडे निधी उपलब्ध नाही. परिणामी थकीत बिलामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्यास त्याचा विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदरची थकीत वीज बिले 15 व्या वित्त आयोगातून अथवा निधीची अन्य तरतूद करून भरण्याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना सूचना द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जि.प. सीईओ कार्तिकेयन एस यांनी जिह्यातील सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जिल्हाधिकारी व जि.प.सीईओंनी गटविकास अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, सद्यस्थितीत सर्व शाळांमध्ये डिजीटल शाळा, आदर्श शाळा, मिशन उत्कर्ष आदी माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण थकीत वीज बिलामुळे शाळांचा वीज पुरवठा खंडीत झाल्यास त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होईल. त्यामुळे ज्या शाळांची वीज बिले थकीत आहेत, ती सर्व बिले 26 जानेवारी 2025 पूर्वी भरण्याबाबत आपल्या अधिनस्त सर्व ग्रामपंचायतींना लेखी सूचना द्याव्यात. सदरची थकीत विद्युत देयके ग्रामपंचायतींनी त्यांच्याकडील 15 वा वित्त आयोगाचा निधी (25 टक्के आरोग्य, शिक्षण व उपजिविका), स्वनिधी अथवा ग्रामपंचायतीकडील उपलब्ध निधीमधून वित्तिय नियमांचे पालन करुन अदा करावीत. भविष्यात शाळांमध्ये वीज देयकाअभावी विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच थकीत वीज बिल भरण्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल 27 जानेवारी 2025 पर्यंत सादर केल्यानंतर त्याचा आढावा 31 जानेवारी रोजी घेतला जाईल.