१०.२५ टक्के उताऱ्यानुसार उसाचा पहिला हप्ता द्या
सहकार विभागाचे आदेश : सुमारे २७०० रुपये मिळणार प्रतिटन दर
ऊस दराबाबत साखर कारखानदारांच्या भूमिकेकडे लक्ष
कोल्हापूर
सहकार विभागाने 2024-25 च्या गळीत हंगामासाठी कोल्हापूरचा आधारभूत साखर उतारा 10.25 टक्के गृहीत धरुन ऊसाचा पहिला हप्ता देण्याचा आदेश साखर कारखानदारांना दिले आहेत. 10.25 टक्के उताऱ्यानुसार ऊसाला प्रतिटन 3400 रुपये मुळ एफआरपी आहे. यातून तोडणी, वाहतूक खर्च सुमारे 700 रुपये वजा करता शेतकऱ्यांच्या हातामध्ये प्रतिटन 2600 ते 2700 रुपये पडणार आहेत. शासनाकडून आधारभूत साखर उताऱ्यानुसार दर जाहीर झाला असला तरी आता उस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या भूमिकेकडे लागून राहिले आहे.
शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील साखर हंगाम 15 नोव्हेंबरपासून सुरु झाला असला तरी अद्याप साखर कारखान्यांनी दर जाहीर केलेले नाहीत. बुधवारी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव अंकुश शिंगाडे यांनी 2024-25 च्या गळीत हंगामासाठी अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या महसूल विभागातील साखर कारखान्यांसाठी आधारभूत उतारा जाहीर केला आहे. यामध्ये पुणे व नाशिक विभागासाठी 10.25 टक्के तर छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर विभागासाठी 9.50 टक्के इतका उतारा जाहीर केला आहे. 10.25 टक्केच्या वरील प्रत्येक 0.1 टक्क्यास उतारा वाढीसाठी प्रिमियम दर 3.32 रुपये प्रति क्विंटल असणार आहे.
दरावरुन संघर्ष पेटण्याची चिन्हे
सहकार विभागाकडून 10.25 टक्के साखर उतारा आधारभूत मानून ऊसाचा पहिला हप्ता देण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील साखर कारखाने सुरु झाले असले तरी अद्याप कोणीही ऊस दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दराच्या पहिल्या हप्त्याबाबत तातडीने कारखानदार आणि शेतकरी संघटना प्रतिनिधींची बैठक घेण्याची मागणी साखर आयुक्तांकडे केली आहे. स्वाभिमानीच्या ऊस परिषदेमध्ये प्रतिटन विनाकपात 3700 रुपये देण्याची मागणी केली आहे. आता सहकार विभागाचा आदेशानुसार दर दिल्यास शेतकऱ्यांना केवळ प्रतिटन 2700 रुपयेच दर मिळणार आहे. त्यामुळे ऊस दरावरुन पुन्हा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
तीस कारखान्यांकडुन गाळप सुरु
कोल्हापूर विभागात 40 साखर कारखाने आहेत. यापैकी 30 कारखान्यांनी हंगाम सुरु केला आहे. जिल्ह्यात ऊसाला वाढ चांगली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे एक लाख 40 हजार हेक्टर तर सांगली जिल्ह्यात एक लाख 37 हजार हेक्टर ऊसाच्या नोंदी झाल्या आहेत. आत्तापर्यंत सुमारे साडे पाच लाख टनहून अधिक ऊसाचे गाळप झाले आहे. तर पाच लाख साठ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन मिळाले आहे. ऊस तोडणीसाठी परजिल्ह्यातून 80 हजार मजूर येतात. पण यंदा हंगाम लांबल्याने अनेक मजूर कर्नाटकमध्ये गेले आहेत. सध्या 70 हजार मजूर दाखल झाले आहेत. तर स्थानिकचे 50 हजार मजूर ऊस तोडणीत व्यस्त आहेत.